मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट घटला

*पॉझिटिव्हिटी रेट ३.७९ टक्के, *ऑक्सिजन बेड २३.५६ टक्के भरलेले

Mumbai's positivity rate dropped

कोरोनाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्या झपाट्याने घटल्याने मुंबईची वाटचाल निर्बंधमुक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे शुक्रवारी आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. ३.७९ टक्के कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि २३.५६ टक्के भरलेले ऑक्सिजन बेड यामुळे मुंबईचा समावेश आता दुसर्‍या स्तरातून (लेव्हल) पहिल्या स्तरात झाला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून (२१ जून) मुंबईतील निर्बंध आणखी शिथिल होण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून अंतिम निर्णय होईल.

राज्य सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार मुंबई पहिल्या स्तरात आली आहे. त्यामुळे सरकारच्या निकषानुसार शहरातील दुकाने पूर्णवेळ सुरू राहू शकतील. याशिवाय मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे यांना सुरू करण्यास परवानगी मिळू शकते. तसेच मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी खुली होऊ शकते. मात्र, याबाबत महापालिकेला निर्णय घ्यावा लागणार आहे.

राज्य सरकारने ४ जूनपासून राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. यासाठी राज्यातील सर्व जिल्हे आणि काही मोठ्या महानगरपालिका यांचे स्वतंत्र प्रशासकीय गट करून त्यांची विभागणी ५ गटात केली होती. दर गुरुवारी जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर करून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला किंवा स्वतंत्र प्रशासकीय गट ठरवण्यात आलेल्या महानगरपालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली.

आजच्या आकडेवारीनुसार बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग या १० जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाचा दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. उर्वरित २५ जिल्ह्यांतील पॉझिटिव्हीटी दर कमी असल्याने या जिल्ह्यात येत्या सोमवारपासून निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

आजच्या आकडेवारीनुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आपला जिल्हा किंवा त्यातील महानगरपालिका कोणत्या गटात नव्याने वर्ग करता येईल. किंवा आहे त्याच गटात कायम राहतील किंवा आहे त्याच गटात कायम ठेऊन निर्बंध कठोर होतील, याविषयीचा निर्णय घेणार आहे.

कोरोना संसर्ग दर

अहमदनगर – ३.०६,
धुळे – २.४५,
जळगाव – ०.९५
मुंबई शहर आणि उपनगर – ३.७९
नंदुरबार – ३.१३
नाशिक – ४.३९
पालघर – ५.१८
पुणे – ९.८८
रायगड -१२.७७
ठाणे – ४.६९

जिल्ह्यनिहाय भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के)

अहमदनगर : ७.९४
धुळे : ०.३३
जळगाव : ९.२२
मुंबई- मुंबई उपनगर : २३.५६
नंदूरबार : ३.४३
नाशिक : ९.०३
पालघर :१८.२४
पुणे : १०.९०
रायगड : १४.०६
ठाणे : १०.७४