घरमुंबईमनसुखचा डायटम रिपोर्ट देणारे डॉक्टर एनआयएच्या रडारवर

मनसुखचा डायटम रिपोर्ट देणारे डॉक्टर एनआयएच्या रडारवर

Subscribe

डायटम चाचणीत मनसुखच्या फुफ्फुसात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते.

मनसुख हिरेन याचा मृत्यू कशाप्रकारे झाला आहे याचे कारण शोधण्यासाठी काढण्यात आलेला डायटम अहवाल संशयाच्या भोवर्‍यात आला आहे. तसेच हा अहवाल बनवणारे डॉक्टर आता एनआयएच्या रडारवर आले असून या डॉक्टरांची आता चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. मनसुखच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आला होता. मात्र, डायटम अहवालात मनसुख याच्या फुफ्फुसात पाणी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते.

अँटालियाजवळ ठेवलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो कारचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा खाडीत सापडला होता. मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा पोलिसांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विच्छेदनासाठी नेला होता. मनसुख याच्या मृत्युचे नेमके कारण कळण्यासाठी मनसुख यांची डायटम चाचणी करण्यात आली होती. या डायटम चाचणीत मनसुखच्या फुफ्फुसात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. मनसुख यांच्या तोंडात सापडलेले ५ ते ६ हातरुमाल त्याच्यावर असलेल्या मास्कमुळे मनसुख याची हत्या झाल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले होते. मात्र, डायटम अहवालामुळे मनसुख याच्या मृत्यूभोवती संशयाचे जाळे तयार झाले होते.

- Advertisement -

या प्रकरणात एनआयएने अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे, सुनील माने, विनायक शिंदे आणि रियाझुद्दीन काजी यांच्या चौकशीत देखील मनसुख याचा मृत्यू कशाने झाला हे कळून येत नव्हते. डायटम अहवालामुळे मनसुख याचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे हे प्रकरण अधिकच किचकट झाले होते. या प्रकरणाचा कट रचणारे मास्टर माईंड आणि कटातील इतर आरोपी एनआयएच्या ताब्यात असून देखील मनसुखच्या मृत्यूचे गूढ उकलत नव्हते.

११ जून रोजी एनआयएने संतोष शेलार, आनंद जाधव आणि गुरुवारी मनीष सोनी आणि सतिश मोटेकर यांना अटक केली. या चौघांच्या चौकशीत या चौघांनी मिळून तवेरा कारमध्येच मनसुख याची हत्या केली, त्यानंतर त्याच्या तोंडात सचिन वाझे याने कळवा स्थानकजवळून विकत घेतलेले हातरुमाल कोंबून त्यावर तोंडाला मास्क लावून मृतदेह मुंबई रेतीबंदर येथील खाडीत फेकला, अशी कबुली या चौघांनी एनआयएला दिली आहे.

- Advertisement -

एनआयएच्या तपासाच्या आधारे मनसुखची पाण्याच्या बाहेरच हत्या करण्यात आली होती तरी त्याचा डायटम अहवाल कसा काढण्यात आला हा प्रश्न आता निर्माण झालाय. याच संशयाच्या आधारे डायटम अहवाल बनवणारे डॉक्टर आता एनआयएच्या रडारवर आले आहेत. एनआयएने या अनुषंगाने तपास सुरू केला असून यामध्ये कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डायटम अहवाल म्हणजे काय?

समुद्र, खाडी, नदी, नाल्यात सापडलेल्या मृतदेहावर मृत्यूचे कारण शोधण्यासाठी डायटम चाचणी करण्यात येते. डायटम नावाचा एक पदार्थ सर्वत्र पाण्यात आढळून येतो. त्याचा अंश समुद्र, नदी, नाल्यात सापडलेल्या मृतदेहात असतो. पाण्याचे नमुने आणि मृतदेहाच्या शरीराच्या आत सापडलेले पाण्याचे नमुने म्हणजे डायटम जुळवले जातात. जर डायटम जुळला तर त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला, असा अंदाज वर्तवला जातो. आणि जर हा अहवाल नकारात्मक आला तर मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पाण्यात टाकला असल्याचा अंदाज बांधला जातो. दरम्यान, जर एखाद्या व्यक्तीची आधीच हत्या झाली असेल आणि नंतर तिला पाण्यात फेकली गेली असेल तर ते पाणी त्याच्या शरीरात जात नाही आणि डायटम अहवाल नकारात्मक येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -