घरमहाराष्ट्रमुंबईची पोरं हुश्शार...

मुंबईची पोरं हुश्शार…

Subscribe

७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे मुंबईत पुण्याला ही टाकले मागे

राज्य शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालात यंदा पुन्हा एकदा कोकणाने बाजी मारली असली तरी या निकालात मुंबईच्या मुलांनीच आपली छाप सोडली असल्याचे दाखवून दिले आहेत. राज्यातील एकूण नऊ विभागीय मंडळात ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांसी संख्या ही मुंबईत जास्त असून मुंबईत तब्बल ३४ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. दरम्यान, निकालाच्या एकूण टक्केवारीत मुंबईला पुण्याने मागे टाकले असले तरी निकालाच्या गुणवत्तेत मात्र मुंबईने बाजी मारत पुण्याला मागे टाकले आहे. पुण्यात ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही १८ हजारांच्या घरात आहे, जी मुंबईत ३४ हजार नोंदविण्यात आलेली आहे, ही आकडेवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असली तरी यंदा ही सर्वाधिक असल्याने मुंबईतील शिक्षणतज्ज्ञांनी सुटकेचा निश्वास सोडला.

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात यंदा एकूण १ लाख २ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविले आहेत. यात एकूण १ लाख विद्यार्थ्यांमध्ये मुंबईच्याच विद्यार्थ्यांनी आपली छाप सोडल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. यंदा मुंबईतून तब्बल ३ लाख १६ हजार १०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी तब्बल २ लाख ६५ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये एकूण ३४ हजार ५४३ विद्यार्थ्यांना ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. हा आकडा लक्षात घेता तो राज्यातील इतर विभागीय मंडळांपेक्षा सर्वाधिक आहेत. मुंबई, पुणे आणि औरंगाबाद वगळता इतर कोणत्याही विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांना पाचअंकी आकडा गाठता आलेला नाही. मुख्य म्हणजे, शिक्षणाची पंढरी समजल्या जाणार्‍या पुण्याला ही मुंबईने यात मागे टाकले आहेत. तर मुंबईतील ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. मुंबईत यंदा ८३ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. तर पुण्यातील ८३ हजार ३२७ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांकडून अधिक गुण मिळविले आहेत.

- Advertisement -

मुंबईच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ४५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख २७ हजार ६६ घरात आहे. त्यानंतर ३५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे १९ हजार ८४३ इतकी असल्याचे बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे. तर पुण्यात ४५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख २ हजार ३०८ इतकी आहे. तर एकूण ७ हजार ५२७ विद्याथ्यार्र्ना उत्तीर्ण श्रेणीत म्हणजेच ३५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविले आहेत. दरम्यान, मुंबईत वाढत असलेल्या विद्यार्थी संख्या लक्षात घेता हा आकडा वाढत असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून वर्तविण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील सीबीएसई आणि आयसीएसई शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेता चुरस वाढल्याने मुंबईतील निकालाचा टक्का वाढल्याचे चित्र दिसून आले असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.

पश्चिम उपनगराचा टक्का सर्वाधिक मुंबईच्या विभागावर निकालात छोडली छाप

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात मुंबई विभागाच्या एकूण निकालात यंदा ४ टक्क्यांनी घसरण झाले खरं. पण मुंबईच्या विभागीय निकालावर नजर मारली असता मुंबईतील पश्चिम उपनगराचा निकाल सर्वाधिक लागल्याचे दिसून आले आहे. यंदा मुंबईच्या पश्चिम विभागाचा निकाल ८४.३३ टक्के लागला आहे. तर मुंबई विभागात सर्वात कमी निकाल हा मुंबई शहर विभागाचा लागला असल्याचे बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात नामांकित कॉलेजांची संख्या वाढत असल्याने हा निकालाचा टक्का वाढल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून वर्तविण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्य शिक्षण मंडळाने सोमवारी मुंबईसह राज्यातील नऊ विभागीय मंडळाच्या निकालाची घोषणा सोमवारी केली. या निकालात मुंबईच्या विभागीय निकालांवर नजर टाकली मुंबईतील ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशा सहा विभागीय निकालांचा एकूण निकाल ८३.८५ टक्के लागला आहे. यात पश्चिम उपनगराचा निकाल सर्वाधिक लागला असून पश्चिम उपनगरातून यंदा एकूण ३९ हजार ६९० नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एकूण ३३ हजार ४७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पश्चिम उपनगरात एकूण ८१.६२ टक्के मुले तर ८७.११ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर सर्वात कमी मुंबई शहर विभागाचा निकाल म्हणजेच ७८.३५ इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबई शहरातून एकूण ४१ हजार ७९६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३२ हजार७४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे.

तर इतर विभागीय निकालांत ठाणे विभागाचा निकाल ८३.३६ टक्के लागला असून पालघरमध्ये यंदा ७३ हजार २३ विद्यार्थी पास झाले आहेत. तर रायघडमधून यंदा ३० हजार १९४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २५ हजार १२६ म्हणजेच ८३.२२ टक्के निकाल जाहीर करण्यात आला आहे. तर पालघर विभागाचा निकाल ८१.९८ निकाल लागला आहे. यात मुलांच्या निकालाचा टक्का ७७.३२ इतका आहे, तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८८.४४ टक्के इतकी आहे. तर मुंबई पूर्व उपनगराचा निकाल यंदा ८२.४४ टक्के नोंदविण्यात आला आहे. या विभागातून मुंबई विभागासाठी सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५७ हजार ५८१ विद्यार्थी पास झाल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे.

बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये

– परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान एक दिवसाची सुट्टी
– परीक्षेच्या भितीने विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची भिती दूर करण्यासाठी विभागीय स्तरावर 57 समुपदेशकांची नियुक्ती
– शिक्षण संक्रमण मासिकातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सूचना
– नऊ भाषा विषयांसाठी कृत्रिपत्रिकांचा वापर
– फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व गणित आणि स्टॅटिस्टिक (आर्ट्स व सायन्स) या विषयांचा प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलेला
– परीक्षेस एकूण 151 विषय होते
– विविध माध्यमांच्या प्रश्नपत्रिकेची संख्या 351 होती.
– सायन्स शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चार माध्यमात प्रश्नपत्रिका उपलब्ध
– अन्य शाखांसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती व कन्नड या सहा माध्यमांमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध
– व्यवसाय शिक्षण विषयक अभ्यासक्रमांतर्गत ई-8, ई-9 व एफ-1 विषयांचा समावेश
– परीक्षेसाठी ई-8, ई-9 व एफ-1 या विषयांना 2283 विद्यार्थी प्रविष्ठ
– गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी राज्यभरात 252 भरारी पथके
– ‘गैरमार्गाचा लढा’ या अभियानाचा कृती आराखडाही मंडळाने राबवला
– श्रेणी सुधार योजनेनुसार घेण्यात आली परीक्षा, श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार दोन संधी
– 29 मे ते 7 जूनपर्यंत गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे
– उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी 29 मे ते 7 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
– उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क रोखीने किंवा डिमांड ड्राफ्टने मंडळाकडे जमा करावे

आर्चीही झाली पास…

सैराट या चित्रपटातून रिंकूला खरी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातून ती आर्ची या नावाने जगप्रसिद्ध झाली. नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाने रिंकूला जगभरात ओळख निर्माण करून दिली. सैराट या चित्रपटामुळे प्रत्येकाच्या मनात घर करणार्‍या आर्चीने म्हणजेच रिंकू राजगुरूने बारावीच्या परिक्षेत चांगले यश संपादित केले आहे.

रिंकू इयत्ता दहावीला असताना दहावीचा निकाल लागल्यानंतर ही आर्चीच्या निकालाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. रिंकूला दहावीत ६६.४० टक्के मार्क मिळाले होते. त्यावेळी रिंकूच्या सैराट चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याने तिला शाळेत जाता आले नव्हते. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याचे रिंकूने त्यावेळी सांगितले होते. मात्र ही कसर रिंकूने बारावीच्या परीक्षेत ६०० पैकी ५३३ गुण मिळवत भरून काढली.

राज्य शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत घेण्यात आलेली परीक्षा रिंकूनेही दिली होती. यात तिला चांगले यश मिळाले आहे. रिंकूने आर्टस ही शाखा निवडली होती. या शाखेतून तिला ८२ टक्के मिळाले आहे. याच बारावी परिक्षेच्या दरम्यान रिंकूचा कागर हा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वी म्हणजे १४ फेब्रुवारीला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची डेट पुढे ढकलण्यात आली होती.

इंग्रजीने फोडला घाम

इंग्रजी विषयाचे भूत मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर चांगलेच बसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत विविध विषयांचे निकाल 90 टक्क्यांपेक्षा अधिक लागला असताना एकमेव इंग्रजीच्या विषयाने बारावीतील विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फोडला आहे. इंग्रजी विषयामध्ये फक्त 86.78 टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. इतकेच नव्हेतर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी इंग्रजीचा निकाल 2.06 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीबाबतची भिती कायम असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. एकीकडे इंग्रजीने विद्यार्थ्यांना घाम फोडला असला तरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतलेल्या परीक्षेमध्ये 151 विषयांपैकी तब्बल 21 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या निकालामध्ये यंदा मुंबई विभागाचा निकाल 83.85 टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईच्या निकालात घट झाली आहे. त्याचप्रमाणे मंडळाकडून घेण्यात आलेल्या 151 विषयांच्या निकालाच्या तुलनेत इंग्रजी विषयाचा निकाला फारच कमी लागला आहे. विविध विषयांचे निकालामध्ये बहुतांश सर्व विषयांचे निकाल हे 90 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. तर भाषेमध्ये सर्व विषयांचे निकाल 95 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. एकीकडे सर्व भाषांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उतीर्ण होत असताना इंग्रजी या महत्त्वाच्या विषयात मात्र विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अनुतीर्ण झाले आहेत.

इंग्रजी विषयाच्या परीक्षेला 14 लाख 62 हजार 909 विद्यार्थी बसले होते. त्यातील 12 लाख 69 हजार 512 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. त्यामुळे इंग्रजीचा निकाल अवघा 86.78 टक्के इतका लागला आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत इंग्रजीच्या निकालातही प्रंचड कमी लागला आहे. गतवर्षी इंग्रजी विषयामध्ये 88.84 टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले होते. यावर्षी यामध्ये 2.06 टक्क्यांनी घट झाली आहे. 2019 च्या निकालामध्ये 86.78 टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. यावरून इंग्रजीमध्ये अनुतीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अन्य भाषा व विषयांच्या तुलनेत इंग्रजीचा विषय कमी लागल्याने मुंबईतील विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर इंग्रजीचे भूत कायम असल्याचे दिसून येते.

एकीकडे इंग्रजीच्या निकाल कमी लागत असताना मराठीच्या निकालात वाढ होत आहे. मराठी विषयाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गतवर्षी मराठी विषयामध्ये 96.86 टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले होते. यामध्ये 0.27 टक्क्यांनी वाढ होऊन यावर्षी तब्बल 97.13 टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.

21 विषयांचा निकाल 100 टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 151 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये 21 विषयामध्ये 100 टक्के विद्यार्थी उतीर्ण झाले. यामध्ये मळ्यालम, तेलगू, पंजाबी, जापनीज, इन्व्हायमेंट एज्युकेशन, ड्राईंग, मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -