घर महाराष्ट्र जनसंवाद यात्रेतून नाना पटोलेंनी साधला भाजपवर निशाणा, म्हणाले - "सरकारचा अन्यायी, अत्याचारी...

जनसंवाद यात्रेतून नाना पटोलेंनी साधला भाजपवर निशाणा, म्हणाले – “सरकारचा अन्यायी, अत्याचारी कारभार…”

Subscribe

रेशनचे धान्य बंद करुन भाजपा सरकारने गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केले आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भंडारा : केंद्रात व राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य जनता व गरिबांच्या हिताचे नाही. काँग्रेसचे सरकार असताना रेशनवर गहू, तांदूळ, डाळ, डालडा, तेल, साखर मिळत होते. पण भाजपच्या राज्यात रेशनवर धान्यच मिळत नाही. देशात गरीब लोक राहिले नाहीत, असे केंद्र सरकार म्हणत आहे. मोदी सरकारने गरीब कुटुंबाला उज्ज्वला गॅस दिला आणि केरोसिन बंद केले, सरकारच्यामते ज्यांच्या घरी गॅस सिलिंडर आहे तो गरीब नाही आणि या लोकांना रेशनवरील डाळ, तेल, साखर, तांदूळ सर्व बंद करुन टाकले. रेशनचे धान्य बंद करुन भाजपा सरकारने गरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचे पाप केले आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole targeted the BJP through Jan Samswad Yatra)

हेही वाचा – मिरवणूक मार्गावरील लटकत्या वीजतारांच्या विरोधात मनसेही आक्रमक 

- Advertisement -

जनसंवाद यात्रेच्या आजच्या (ता. 12 सप्टेंबर) 10व्या दिवशी नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरातील पदयात्रेत सहभाग घेतला व दुपारी सभा घेतली. त्यानंतर झेंडा चौक, सेंदुरवाफा येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली व संध्याकाळी जुनी पंचायत समिती परिसर, साकोली येथील जाहीर सभेला संबोधित केले.

जनसंवाद यात्रेतील सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी, व्यापारीविरोधी, गरिबांच्याविरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या शेतात डाळ पिकते, त्यावेळी डाळीला भाव नसतो आणि तीच डाळ अदानीच्या गोडाऊनमध्ये गेली की 170 रुपये किलो होते. दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करा, त्यावर आपल्याला जीएसटी द्यावा लागतो. राज्यातील हिटलर सरकार शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही तर कनेक्शन तोडते. उन्हाळी धानाचे पैसे अजून मिळाले नाहीत. आठ दिवसात पैसे देण्याचा नियम आहे पण सरकारने शेतकऱ्यांचा तीन-चार महिने दैसे दिले नाहीत, असे म्हणत पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

तसेच, गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर त्याचा उपयोग काय? खतांच्या किमती दुप्पट केल्या व खतांचे पोते 50 किलोऐवजी 45 किलोचे केले. खतांची लिंकिग करुन शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतीला लागणारा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यावर 18 टक्के जीएसटी द्यावा लागतो आणि कार खरेदी करायची असेल 12 टक्के जीएसटी द्यावा लागतो. भाजपा सरकार आल्यापासून देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, गृहिणींच्या आत्महत्या वाढल्या आहेत, तरुणांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. भाजपाच्या राज्यात मरण स्वस्त झाले आहे, लोकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करु नये, काँग्रेस तुमच्यासोबत आहे, असे आवाहनही नाना पटोले यांच्याकडून करण्यात आले आहे.

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे दुःख, वेदना, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. जनसंवाद यात्रा खुर्चीच्या लढाईसाठी नाही तर लोकशाही, संविधान व देश वाचवण्याची लढाई आहे. ही लढाई आपण मिळून लढू व देश, लोकशाही व संविधान वाचवू, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. तसेच, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात जनसंवाद यात्रा उत्साहात पार पडली. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खिरोदा गावातील त्यांच्या स्मृतींना थोरात यांनी अभिवादन केले.

उत्तर महाराष्ट्रात जनसंवाद यात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिला. विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील हनुमान मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात केली. यामध्ये महिला, युवक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बांबवडे येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या संवाद सभेसाठीही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघात जनसंवाद यात्रेदरम्यान शेतकऱ्यांशी, शेतमजुरांशी संवाद साधला. यात्रेत कलावतीबाई बांदुरकर देखील सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला राज्यभर जनतेने चांगला प्रतिसाद दिला.

- Advertisment -