घरमहाराष्ट्रठाकरे सरकार मार्चमध्ये पडणार

ठाकरे सरकार मार्चमध्ये पडणार

Subscribe

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार येत्या मार्च महिन्यात पडणार असून मार्च महिन्यातच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार येईल, अशी भविष्यवाणी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. जयपूर येथे काही कामानिमित्त आलेले नारायण राणे मीडियाशी बोलत होते.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे आयुष्य जास्त नाही. एखादे सरकार पाडायचे असेल आणि नवे सरकार स्थापन करायचे असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात, असे राणे म्हणाले. महाराष्ट्रातील सरकार भेदभाव करत असल्याच्या आरोपावर नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपाचे सरकार नाही त्यामुळे तिथे तसे होतेय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाही आहे. एखादे सरकार पाडायचे असेल आणि नवे सरकार स्थापन करायचे असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांचे सरकार फार दिवस नसेल का असे विचारले असता नारायण राणे यांनी जो व्यक्ती आजारी आहे आणि बेडवर आहे त्या व्यक्तीवर नाव घेऊन बोलणे योग्य नाही, असे उत्तर दिले. तसेच महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडीचे सरकार आहे त्याचे आयुष्य जास्त नसल्याचाही सूचक इशारा राणेंनी दिला. यावेळी पत्रकारांनी मार्चपर्यंत सरकार बदलणार का असे विचारले असता त्यांनी हसत त्यावर उत्तर देणे टाळले. माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचे असेल किंवा नवे सरकार आणण्यासाठी काही करायचे असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.

नारायण राणे काय बोलले हे मी ऐकलेले नाही.
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा.

- Advertisement -

काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावेच लागत आहे.
-नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस.

भाजप भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांची भविष्यवाणी खोटी ठरू लागली आहे. त्यावर कुणाचाही विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही. राज्यातले सरकार ५ वर्षे चालेल.
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

नारायण राणे काय म्हणतात यावर सरकार चालत नाही. सरकार संख्याबळावर चालते आणि आज महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ आहे. या संख्याबळावरती हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल.
-अ‍ॅड. अनिल परब, परिवहन मंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -