नसीरुद्दीन शाह यांच्या मुलीकडून रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण, तक्रार दाखल

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची मुलगी हिबा शाह हिच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिबाने १६ जानेवारी रोजी य़ेथील प्राण्यांच्या रुग्णालयात दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने हीबा विरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हिबाची मैत्रीण सुप्रिया शर्मा ही वाईल्ड वुड पार्कमध्ये राहत असून तिच्याकडे दोन मांजरी आहेत. या मांजरीवर नसबंदी शस्त्रक्रिया करावयाची असल्याने व सुप्रियाला वेळ नसल्याने हिबा मांजरींना घेऊन येथील फेलाईल फाऊंडेशनच्या पशु रुग्णालयात आली होती. त्यासाठी रुग्णालयातर्फे शस्त्रक्रियेची वेळही ठरवण्यात आली होती. मात्र ऐनवेळी कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रिया आज होऊ शकत नसल्याचे हिबाला सांगितले. तिने कारण विचारताच कर्मचाऱ्यांनी तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संतापलेल्या हिबाने कर्मचाऱ्यांबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावरून कर्मचारी व तिच्यात वादही झाला. संतापलेल्या हिबाने महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे मध्यस्थी करण्यासाठी दुसरी कर्मचारी महिला धावून आली. पण तिलाही हिबाने मारहाण केली. ही मारहाणीची घटना रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने हिबा विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हिबावर कारवाई करण्यात यावी अशी अनेकांनी मागणी केली आहे.