Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र नाशिक ढोलचा डंका : शास्त्रशुद्ध मर्दानी खेळ शिकवणारे 'तालरुद्र ढोलताशा पथक'

नाशिक ढोलचा डंका : शास्त्रशुद्ध मर्दानी खेळ शिकवणारे ‘तालरुद्र ढोलताशा पथक’

Subscribe

नाशिक : वादकांना शास्त्रशुद्ध वादन शिकवण्यासह ११ मात्रांचा रुद्रताल, साडेनऊ मात्रांचा सुनंद ताल, सात मात्रांचा रुपक ताल यांसह बंदिशी वादकांना शिकवणारे म्हणून तालरुद्र ढोलपथकाचे नाव आहे. या ढोलपथकातर्फे शास्त्रशुद्ध वादनावर सर्वाधिक भर दिला जातो, अशी माहिती तालरुद्र ढोलतशा पथकाचे संस्थापक अनिरुद्ध भूधर यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली. (Talrudra Dholtasha pathak, Nashik)

अनिरुद्ध भूधर पुढे म्हणाले की, नाशिकमध्ये गणेशोत्सवात ढोलपथक असले पाहिजे असे नेहमी वाटायचे. बालपणापासून ढोलवादनाची आवड असल्याने २०१३ मध्ये पुण्याला मित्रांसमवेत ढोलवादन पाहण्यास गेलो होते. अनेक ढोलपथकांचे वादन बघितले. शिवाय, पथकप्रमुखांकडून माहिती घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये तालरुद्र ढोलपथकाची ऑगस्ट-२०१३ मध्ये स्थापना केली. तालरुद्रचे चैतन्य नंदकिशोर जोशी व रवींद्र राऊत हेसुद्धा संस्थापक आहेत. सुरुवातीला १३ वादक होते. आता तालरुद्रमध्ये १८३ पुरुष व १४० महिला आहेत. यामध्ये चिमुकल्यांपासून वयोवृद्धांचासुद्धा समावेश आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी ५०० हून अधिक वादक वादन करतात.

- Advertisement -

सुरुवातीला नाशिकमध्ये कोठे वादन करायचे, ढोल कोठून आणायचे, असे अनेक प्रश्न होते. मात्र, भोसला मिलिटरी स्कूलने वादनासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यावेळी भोसला स्कूलने ढोलसुद्धा वादनासाठी दिले होते. पूर्वी ४० ढोल होते. आता पथकाकडे ९२ ढोल, २५ ताशा, १०१ ध्वज व एक टोल आहे. पांढरा कुर्ता, पायजमा आणि जॅकेट असा पथकाचा पोशाख आहे. दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेवा युवक मंडळातर्फे वादन केले जाते.

गणेशोत्सवाच्या आधी दोन महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर रोडवरील लक्ष्मी लॉन्समध्ये तालरुद्र ढोलपथकाचा सराव केला जातो. लक्ष्मी लॉन्सचे संचालक प्रवीण काकड यांचे नेहमी सहकार्य असते. त्यांनी नाममात्र शुल्कामध्ये लॉन्स उपलब्ध करून दिले आहे. कलर्स ऑफ रिदम या कार्यक्रमावेळी तालरुद्र पथकाने वादन केले होते. प्रख्यात तबलावादक झाकीर हुसेन यांनीदेखील तालरुद्र ढोलवादनाची दखल घेतली होती, ही बाब आमच्यासाठी अभिमानस्पद बाब आहे. पं. सुरेश तळवळकर नाशिक दौर्‍यावर आले असताना त्यांनी तालरुद्रचे वादन अनुभवले. त्यानंतर त्यांनी पथकाचे कौतुकही केले. पथकाने नाशिक शहरासह, धुळे, निजामपूर आणि आंध्रप्रदेशमधील सत्यसाईबाबांच्या उत्सवावेळी वादन केले आहे.

- Advertisement -

डीजेला बंदी असल्याने ढोलपथकांना सुवर्णकाळ आला आहे. मराठी संस्कृतीची जोपासना आमते पथक करत असल्याने दिवसेंदिवस वादकांची संख्या वाढत आहे. वादकांना वादनातून मिळणार्‍या आनंदातून ऊर्जा मिळत जाते. शिवाय, वादनावेळी एनर्जी ड्रीक, पाणी, जेवण दिले जाते. त्यामुळेही वादकांमधील उत्साह दुणावतो. तालरुद्र ढोलपथकातर्फे वर्षभर तारखेनुसार व तिथीनुसार शिवजयंतीच्या दिवशी, गुढीपाडवा, गणेशोत्सवात प्रतिष्ठापना, विसर्जनाच्या आदल्या दिवशी आणि विसर्जनावेळी वादन केले जाते. मानधनातून पथकातील ढोल, ताशांची देखभाल व दुरुस्ती केली जाते.

अशी आहेत वैशिष्ठ्ये

  • तालरुद्र पथकातर्फे वादकांना ढोलवादनासह मर्दानी खेळातील लाठीकाठी, गोफ, दानपट्टा शिकवला जातो.
  • सुरुवातीला वादकांना पारंपरिक वाद्यांची ओळख करून दिली जाते.
  • वादन शिकण्याआधी ताल म्हणवून घेतला जातो. त्यानंतर वादन करण्यास दिले जाते.
  • पथकात पहिल्या दिवसापासून महिलांचा सहभाग आहे
  • नियमित वेळेत सराव करणे, वादनावेळी फॅन्सी कपडे वापरू नयेत, स्त्रोत्र व मंत्र पाठ असलेले पाहिजेत, असे वादकांसाठी नियम आहेत.

वादनामुळे कोणताही त्रास होत नाही

ढोलवादनाने शारीरिक व्याधी होत नाहीत. साईजनुसार प्रत्येकाला ढोल दिले जातात. शिवाय, नियमित सराव केल्याने वादन करताना आणि केल्यानंतरही कोणताही त्रास होत नाही. ढोलवादन केल्याने शारीरिक व मानसिक थकवा नाहीसा होतो. वादक तणावमुक्त वातावरणात आनंदाने वादन करतात. वादनामुळे नकारात्मकता नाहीशी होते. सांघिक कार्यामुळे एकोप्याची भावना निर्माण होते. पथकामध्ये वकील, डॉक्टर, व्यावसायिक, इंजिनिअर, नोकरदार आहेत, असे अनिरुद्ध भूधर यांनी सांगितले.

नागरिकांच्या प्रोत्साहन गरजेचे

ढोलवादन ही सादरीकरण कला आहे. संगीताची आवड नसलेल्यांना वादनाचे ध्वनी प्रदूषण वाटते. प्रत्येक वादन हे लयबद्ध व तालबद्ध असते. कोणत्याही पथकांमधील वादकाने चुकीचे काम केलेले नाही, त्यामुळे समाजाचा ढोलपथकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. आजअखेर शहरात सुमारे ५ हजार ढोलवादक आहेत. त्यांना नागरिकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे भूधर यांनी सांगितले.

- Advertisment -