घरताज्या घडामोडीभाजपला हददपार करण्यासाठी नाशिक ही प्रयोगशाळा : खासदार राऊत

भाजपला हददपार करण्यासाठी नाशिक ही प्रयोगशाळा : खासदार राऊत

Subscribe

नाशिकमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाचा हुंकार दिला. त्यांना बदनाम करण्याचा काम भाजप करतयं परंतु आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आज आम्ही या गाडीत असू किंवा त्या गाडीत. आगामी महापालिका निवडणुकांसह विधानसभा इतकंच काय दिल्लीत धडक देण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करतांना भाजपला हददपार करण्यासाठी नाशिक ही प्रयोगशाळा असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

नाशिक येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आयोजित शिवसेना संवाद मेळाव्यात खा. राउत बोलत होते. राऊत बोलण्यासाठी उभे राहीले असता शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांच्या घोषणेचा संदर्भ देत राऊत म्हणाले, आपले लोक म्हणतात हम तुम्हारे साथ है, पण आपले विरोधक म्हणतात ईडी, सीबीआय, एनसीबी सोबत हम तुम्हारे साथ है आणि यांच्या साथीने आम्ही तुमचा सामना करू. ठिक आहे, हिंमत असेल तर समोरासमोर येउन दोन हात करा, तुम्ही पाठीमागुन वार करात तरी आम्ही समोरूनच वार करू असे सांगत त्यांनी भाजपला इशारा दिला. २८ ऑक्टोबरला राज्यात महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण होत आहे. काही लोक सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार, उद्या पडणार असे भाकित वर्तवत आहे. पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना हलविण्याची कोणाची हिंमत नाही. त्यामुळे आघाडी सरकार पाच वर्षे तर पूर्ण करेल शिवाय पुढील पाच वर्षे आपलीच आहेत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबई, ठाणे, डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे नाशिकही शिवसेना बालेकिल्ला आहे. आगामी महापालिका निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा असे सांगत विधानसभेत शिवसेनेचा नाशिकचा एकही प्रतिनिधी नाही याची खंत व्यक्त करतांनाच विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठीही तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. राज्यातील मंत्र्यांवर दररोज भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रात चरस,अफु, गांजांच पिकं निघतयं असे भासवले जात आहे. याव्दारे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी व्यासपीठावर कृषीमंत्री दादा भुसे, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, सुनील बागुल, नयना घोलप, योगेश घोलप आदिंसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -