घरमहाराष्ट्रनाशिकअखंड पाषाणातील १०८ फूट भगवान ॠषभदेवांची मूर्ती

अखंड पाषाणातील १०८ फूट भगवान ॠषभदेवांची मूर्ती

Subscribe

१९ वर्षे चालले निर्माण कार्य, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान

अहिंसा परमो धर्म हे जैन धर्माचे मूलतत्व आहे. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या जैन धर्माच्या सध्याच्या सर्वोच्च आयिर्र्का १०८ फूट प्रतिमा निर्माणच्या प्रेरणास्त्रोत, गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांच्या संकल्पनेतून विश्वशांती अहिंसा संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. श्री क्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर १०८ फूट उंचीची अखंड पाषाणतून भगवान ॠषभदेवांच्या मूर्तीचे निर्माण कार्य करण्यात आले. १९९६ मध्ये श्री ज्ञानमती माताजी यांना या मूर्तीच्या निर्माण कार्यासाठी प्रेरणा झाली. १९९८ मध्ये धर्मादाय विभागाकडे मूर्ती निर्माण कमिटीची नोंदणी करण्यात आली. आधी कळस मग पाया याप्रमाणे मूर्तीचे निर्माण कार्य पार पडले आहे. अर्थात, हे काम इतके सोपे नव्हते. याकरिता सर्वप्रथम केंद्र व राज्य सरकार आणि वनविभागाकडून आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करण्यात आल्या. मूर्ती निर्माणासाठी पर्वतावर ८० एकर जमीन ट्रस्टला प्राप्त झाली आणि २००२ मध्ये मूर्तीचे शिलापूजन करण्यात आले. १०८ फूट मूर्ती दोन एकर जागेत उभी आहे. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.

मांगी तुंगी हे जैन धर्मीयांचे दुसरया क्रमांकाचे प्राचीन सिध्दक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक भेट देतात. मांगी तुंगी पर्वतावर ९९ कोटी मुनींनी तपसाधना करून मोक्षप्राप्ती केल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेे या पर्वताला जैन धर्मात अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे. पर्वतावर प्राचीन मंदिरे, लेणी, गुहा असून वर्षानुवर्षांपासून येथे जैन बांधवांकडून उपासना केली जाते.
जैन धर्माच्या सर्वोच्च गणिनीप्रमुख आर्यिका ज्ञानमती माताजी १९९६ साली चार्तुमासाच्या निमित्ताने मांगीतुंगी येथे आल्या होत्या त्यावेळी तप, अंतर्ध्यायाने झालेल्या साक्षात्कारामुळे या पवित्र पर्वतावर प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान ॠषभदेव यांची १०८ फुटी अखंड पाषाणातील मर्ती निर्माणाचे कार्य हाती घेण्यात आले. माताजी यांनी निश्चित केलेली मूर्तीची जागा पर्वताच्या मध्यावर जमिनीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर होती. त्यासाठी जाण्यासाठी रस्ता तर दूर मात्र पायवाटही अस्तित्वात नव्हती.
जगाच्या पाठीवर अखंड पाषाणातील १०८ फुटी मुर्ती कोठेही नसल्याने या मूर्तीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. पर्वताच्या मध्यावर अखंड शिळा शोधून त्यात भगवान ॠषभदेव यांची १०८ फुट मूर्ती साकारणे हे दिव्यच होते. माताजी यांच्या नेतृत्वाखाली व समितीचे अध्यक्ष कर्मयोगी पीठाधीश स्वस्तीश्री रवींद्रकिर्ती स्वामीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पार पडले.
भूगर्भ शास्त्रज्ञांच्या सकारात्मक पाहणी अहवालानंतर ३ मार्च २००२ रोजी या विशाल मूर्तीचा शिलान्यास कार्यक्रम झाला. तर मूळ मूर्ती कामाला १२ डिसेंबर २०१२ रोजी ख-या अर्थाने प्रारंभ झाला. २०१६ साली या विश्वविक्रमी मूर्तीचा प्रथम महामस्तकाभिषेक सोहळा पार पडला. ४५० फूट लांबी व ५५ फूट रुंदीचा अखंड पाषाण कापून त्यात मूर्तीला आकार दिला गेला. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा विद्यमान केंद्रीयगृहमंत्री अमित शहा, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थि होते.

- Advertisement -

कुठे आहे निर्माण स्थान

नाशिकपासून १२५ कि.मी.वर बागलाण (सटाणा शहरापासून विंचूर-प्रकाशा मार्गावर सुमारे ३५ कि.मी.) तालुक्यात मांगीतुंगी हा पर्वत आहे. पायथ्याशी भिलवाड गाव असून, तेथील दिगंबर जैन सिद्धक्षेत्र संस्थानपासून तीन कि.मी. अंतरावर पर्वतास प्रारंभ होतो. समुद्रसपाटीपासून ४३४३ फूट उंचीवर मांगी, तर ४३९९ फूट उंचीवर तुंगी शिखर आहे. तेथील शिखरांच्या पायथ्याशी भगवान महावीर, हनुमान, वाली आणि सुग्रीव यांच्यादेखील तब्बल ३५६ कोरीव मूर्ती या ठिकाणी आहेत.

अनुभवी हातात काम

दीडशे वर्षांपासून फक्त जैन परंपरेनुसारच मूर्ती घडविणा-या नाथाज् फर्म या संस्थेचे मुख्य मूर्तिकार चत्राराम यांच्या देखरेखीखाली मूर्तीचे कोरीव काम करण्यात आले. ३४ अनुभवी कारागिरांपैकी २४ कारागिर मूर्ती घडविण्यात तर तर १० कारागीरांकडून पॉलिशचे काम करण्यात आले. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत अविश्रांत हे काम सुरू होते.

- Advertisement -

अशी आहे मूर्ती

  • डोक्याचे केस – ५ फूट
  • मुख – १२ फूट
  • मान – ४ फूट
  • कान – १४ फूट
  • मान ते छाती -१२ फूट
  • छाती ते नाभी – १२ फूट
  • नाभी ते टोंगळे – ३६ फूट
  • टोंगळे – ४ फूट
  • टोंगळे ते पायाचा घोटा- २९ फूट
  • तळपाय – ४ फूट
  • कमळ – ५ फूट
  • चौथरा – ३ फूट

असे झाले निर्माण कार्य

ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम १२० फूट लांबीच्या कापडावर या प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले व त्याबरहुकूम ही मूर्ती घडविण्यात आली. मूर्तीची रचना निश्चित करण्यासाठी अनेक दिवस अभ्यास सुरू होता. त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानासह पाली, संस्कृतसह दहा भाषांतील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला. जैन परंपरेतील वसुनंदी ग्रंथातील उल्लेखांचाही अभ्यास करण्यात आला. संस्कृत, ताडपत्रांवरील ग्रंथ, तामिळ, कन्नड, तेलगू, वैष्णव ग्रंथ, द्रविड, हीडा, ग्रीक मायथॉलॉजी आदी ग्रंथांतील वर्णनांचा अभ्यास झाला. त्यात उल्लेख असलेले अंगुलीचे प्रमाण अभ्यासण्यात आले. त्याचे रूपांतर फुटांत करून मूर्तीचे परिमाण निश्चित करण्यात आल्याने ही विश्वातील सर्वांग सुंदर मूर्ती तयार झाली आहे.

– मनीष कटारिया

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -