घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रग्रामपंचायतीने १८वर्षांनी फेडले जिल्हा परिषदेचे 'इतक्या' लाखांचे कर्ज

ग्रामपंचायतीने १८वर्षांनी फेडले जिल्हा परिषदेचे ‘इतक्या’ लाखांचे कर्ज

Subscribe

नाशिक : सिन्नर तालुक्यातील वडांगळी या ग्रामपंचायतीने 18 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून घेतलेल्या कर्जाची एकरकमी परतफेड करत या ग्रामपंचायतीने झेडपीला एकप्रकारे दिवाळी भेटच दिली आहे. आमदार माणिकराव कोकाटे, इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे सुपुर्द केला.

गावातील विकासकामांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ग्रामनिधीतून संबंधित ग्रामपंचायतीला कर्ज पुरवठा केला जातो. वडांगळी ग्रामपंचायतीने 2004 मध्ये व्यापारी संकुल बांधण्यासाठी 12 लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जावरील व्याजासह ही रक्कम तब्बल 15 लाख रुपयांवर पोहोचली. त्यामुळे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी थकित कर्ज असलेल्या ग्रामसेवकांची बैठक घेत कर्जवसूली करण्याची सूचना केली होती. त्याआधारे गावातील सरपंच राहुल खुळे, माजी सरपंच योगेश घोटेकर यांनी हे कर्ज फेडण्याचा निश्चय केला. त्यासाठी गावकर्‍यांना पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

थकीत करपट्टी धारकांची नावे सोशल मीडियावर व्हायरल केली जातील, अशी गावांत दवंडी दिली. त्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकर्‍यांनी स्वयंस्फुर्तिने 17 लाख रुपये भरले. ग्रामपंचायतीने यातील पाच लाख रुपये हे मुद्रांक शुल्कापोटी दिले. तर 2004 मध्ये घेतलेल्या कर्जापोटी 10 लाख 3 हजार 383 रुपयांचा धनादेश जिल्हा परिषदेकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी (दि.21) आमदार कोकाटे यांच्याहस्ते हा धनादेश जिल्हा परिषद सीईओ मित्तल यांच्याकडे दिला. यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, गावचे सरपंच राहुल खुळे, उपसरपंच रवींद्र माळी, सदस्य अमोल अढांगळे, विक्रम खुळे, क्लर्क सुरेंद्र कहांडळ, नवनाथ गायधनी, कानिफ घोटेकर उपस्थित होते.

आमदार माणिकराव कोकाटे यांनी आम्हाला सकारात्मक विचारांनी काम करण्याचा मुलमंत्र दिला आहे. त्यानुसार आम्ही 20 वर्षांपूर्वीचे कर्ज फेडले. तत्कालिन ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठीच हे कर्ज घेतले होते. आम्ही ग्रामपंचायत कर्जमुक्त केल्याचा आनंद आहे. : योगेश घोटेकर, माजी सरपंच, वडांगळी, ग्रामपंचायत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -