घरमहाराष्ट्रनाशिकघर जळाल्याने रोहित्रावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

घर जळाल्याने रोहित्रावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

नाशिक : वणी येथील लेंडीपुरा भागात घर जळून खाक झाल्याने आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून तरुणाने विद्युत प्रवाह सुरु असलेल्या रोहित्रावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, दैव बलवत्तर असल्याने तीव्र वीजेचा धक्का लागूनही तो वाचला. त्याच्यावर वणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश कल्लू महाले (वय २८) असे जखमी तरुणाचे नाव आहे. वणी लेंडीपुरा परिसरातील कल्लू बारकू महाले यांचे घर बुधवारी (दि.१९) सायंकाळी जळून गेले होते. घर जळून खाक झाले. कुटुंबातील सदस्यांच्या अंगावरचे कपडेच राहिले. संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. काहीच शिल्लक राहिले नसल्याने कुटुंबियांना धक्का बसला.

कल्लू बारकू महाले यांचा मुलगा योगेश महाले (वय २८) ग्रामीण रुग्णालय परिसरातील महावितरणच्या विद्युत रोहित्रावर चढला होता. दरम्यान, विद्युत रोहित्रावर स्पार्क झाला. ओरडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतले. योगेशला विजेचा जोरदार धक्का बसला होता. त्यात त्याचा हात व छाती भाजली. दैव बलवत्तर असल्याने तीव्र वीजेचा धक्का लागूनही तो वाचला. ११ केव्हीचा वीजपुरवठा सुरु होता. विद्युत रोहित्राच्या खांबावर तो दिसल्याने नागरिकांना तात्काळ महावितरणच्या वणी उपकेंद्राला माहिती दिली. त्यानंतर वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विद्युत उपकेंद्राचे उपअभियंता मुळकर यांनी वीज कर्मचार्‍यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कर्मचारी आर. जी. पवार, एन. एस. भरसट, एम. पी. गावित यांनी विद्युत रोहित्रावर चढून बसलेल्या व जखमी अवस्थेत असलेल्या योगेशला दोरखंड बांधून सुखरुप खाली आणले. त्यास वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तो सुमारे ३० टक्के भाजला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. वणी ग्रामीण रुग्णालय नागरिकांनी गर्दी केली होती.

- Advertisement -
आगीत संसाराची राखरांगोळी

ही आग विद्युत वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. कल्लु बारकू महाले हे लेंडीपुरा परिसरात राहतात. ते मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. महाले यांचे घर जुन्या पद्धतीचे कौलारु असून, त्यावर प्लॅस्टीकने आच्छादन केले होते. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -