घरमहाराष्ट्रनाशिकसिव्हिल : ओपीडीच्या वेळेत महत्वपूर्ण बदल; रुग्णांची गैरसोय टळणार ?

सिव्हिल : ओपीडीच्या वेळेत महत्वपूर्ण बदल; रुग्णांची गैरसोय टळणार ?

Subscribe

नाशिक :  शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभागात पूर्वी सकाळी ८:३० ते दुपारी १२:३० आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ यावेळेत रुग्णांना सेवा दिली जात होती. परंतु या वेळेमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरातीलही काही रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. तसेच सायंकाळच्या २ तासाच्या ओपीडीला जास्त गर्दी होत होती. यामुळे ओपीडी सकाळी काहीशी उशिरा सुरू करून सलग सेवा देण्यात यावी अशी मागणी अनेक दिवस केली जात होती. त्याच अनुषंगाने बाह्य रुग्ण विभागाची अर्थात ओपीडीची वेळ बदलून सकाळी ९ ते दुपारी ३ अश्या सलग वेळेत सुरू करण्याचा निर्णय बुधवारी (दी.२) घेण्यात आला आहे. त्याचसोबत जेवणाच्या सुट्टीची वेळही कमी करण्यात आल्यामुळे ओपीडी मध्ये सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत. ओपीडीच्या वेळेत बदल झाल्याने रुग्णांची व नातेवाईकांची गैरसोय टळणार आहे.

शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ग्रामीण भागातील बहुतांशी रुग्ण सकाळच्या वेळेत येतात. सकाळच्या सत्रात या रुग्णांची चिकित्सा झाली नाही तर त्यांना थेट सायंकाळ पर्यंत वाट बघावी लागत होती. त्यामुळे त्यांना परतीच्या प्रवासालाही अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्याचसोबत दिवसभर ताटकळत राहावे लागत असल्याने त्यांची चांगलीच गैरसोय होत होती. या निर्णयामुळे रुग्णांना सलग सेवा मिळणार असल्याने तसेच पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध राहणार असल्याने तत्काळ त्यांची चिकित्सा होऊन त्यांना वेळेत परतने शक्य होणार आहे.

- Advertisement -

 रुग्णांना आता वेळेत तपासणी करून आपल्या घरी जाता येणार आहे. तसेच शहर व परिसरातील नागरिकांची गैरसोय टळणार आहे. शहर व परिसरातील नागरिकांना आता वेळेत उपचार मिळणार आहे. मेडिकल काॅलेज प्रशासनाचे डीन यांनी या वेळेत बदल केला आहे. आधीची ओपीडीची वेळ गैरसोयीची असल्याची तक्रार हाेती. आता त्यात बदल केल्याने नवीन वेळ ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही सोयीस्कर आहे. पूर्वीच्या वेळेत सकाळी डाॅक्टर उपलब्ध होत असत. दुपारी डाॅक्टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती. ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात मुक्काम करावा लागत होता. नवीन वेळेमुळे रुग्णांची गैरसोय टळणार की हा प्रयोगही अयशस्वी ठरणार हे पुढील काही दिवसात लक्षात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -