Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र घंटागाडी ठेकेदार कर्मचार्‍याला म्हणतो, "नागरिकांचा जीव जाऊ दे"; बघा काय होते संभाषण

घंटागाडी ठेकेदार कर्मचार्‍याला म्हणतो, “नागरिकांचा जीव जाऊ दे”; बघा काय होते संभाषण

Subscribe

नाशिक : महापालिकेचा जावई बनलेल्या घंटागाडी ठेकेदाराचा उद्दामपणा इतका वाढला आहे की, महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाने घंटागाडीचे टायर फुटल्याची तक्रार केल्यावर या ठेकेदाराने मोबाईलव्दारे धमकावत ‘नागरिकांचा जीव जात असेल तर जाऊ दे, तुला काय करायचे?’ असा उलट सवाल केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यासंदर्भात ठेकेदार चेतन बोरांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांच्या जीवाची पर्वा नसलेल्या अशा ठेकेदाराचे पालिका लाड का पुरवते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

महापालिकेकडून पूर्व व पश्चिम विभागातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी मे. वॉटरग्रेस कंपनीला काम दिले आहे. नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या या वॉटर ग्रेस कंपनीला स्थायी समितीने यापूर्वी ब्लॅक लिस्ट केले होते. कर्मचार्‍यांना पुरेसा पगार न देणे, त्यांना बोनस न देणे, घंटागाडी नियमीतपणे न फिरवणे यासह असंख्य तक्रारी या ठेकेदाराच्या बाबतीत आहेत. परंतु तरीही प्रशासन या ठेकेदारावर इतकी ‘माया’ लावते की, त्यालाच वारंवार कचरा संकलनाचा कोट्यवधींचा ठेका दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा ठेका मिळत असल्याने त्यात उद्धटपणा वाढला आहे. काही दिवसांपूर्वी घंटागाडीचे टायर फुटल्याची तक्रार एका स्वच्छता निरीक्षकाने ठेकेदार बोरा यांच्याकडे केली. मात्र या तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी बोरा यांनी स्वच्छता निरीक्षकाला व्हॉटस अ‍ॅप कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नियमीत कॉलवर संवाद साधा असे सांगत स्वच्छता निरीक्षकाने व्हॉटस अ‍ॅप कॉलवर बोलण्यास नकार दिला. यावेळी बोरा यांनी ज्या शब्दात स्वच्छता निरीक्षकाला सुनावले ते बघता बोरा हे महापालिकेचे मालक आहेत आणि त्यांना महापालिका कर्मचार्‍यांशी अतिशय उद्धटपणे बोलण्याची जणू परवानगीच मिळाली आहे, असा समज होऊ शकतो. यासंदर्भात चेतन यांच्याशी ‘माय महानगर’ प्रतिनिधीचा संपर्क होऊ शकला नाही.

असे आहे संभाषण 

 • चेतन बोरा : माझ्याकडे तुझा नंबर सेव्ह नाही म्हणून मी तुला व्हॉटस अ‍ॅप कॉल केला. नाहीतर माझ्या काय XXX ला खाज पडलीय की तुला कॉल करायला? एवढंच आहे की, तू सांगितलं असतं तर काम केलं असतं. रिकामं आमच्या गाडीतलं टायर.. तुला काय करायचं त्याच्याशी
 • स्वच्छता निरीक्षक : दादा, माझं हे काम आहे. मी तुमच्याशी बोलताना अहो-जाहो करतोय आणि तुम्ही म्हणता तुला काय करायचं? म्हणजे काय?
 • चेतन बोरा : मी प्रेमात तुम्हाला सांगतोय, तेव्हापासून दादा, दादा, दादा.. तू मला& शिकवतोय का?
 • स्वच्छता निरीक्षक : तुम्ही ही कोणती भाषा वापरताय? तुम्ही पैसेवाले असले म्हणून आम्हाला काहीही बोलाल का? तुम्ही अरेरावी का करताहेत?
 • चेतन बोरा : मी अरेरावी नाही केली. मी तुम्हाला एवढंच बोललो की, तुमचा प्रॉब्लेम काय होता. तर, तुम्ही बोलले की मला धमकावतो का? प्रॉब्लेम काय आहे ते सांगायचे? नाही सॉल्व्ह केला तर बोलायचं?
 • स्वच्छता निरीक्षक : मी किती वेळा सांगितलं की, टायर फुटल्याने अ‍ॅक्सिडेंट होईल कोणाचा. टायर लूज आहे..
 • चेतन बोरा : त्याचं तुला काय करायचं आहे. नागरिकाचा जीव जाईल तर नागरिक पाहतील ना.. तो आमचा माणूस पाहिल आणि नागरिक पाहतील ना..
 • स्वच्छता निरीक्षक : मग आम्हाला कशासाठी नेमलं आहे?
 • चेतन बोरा : कशासाठी नेमलं हे आता तू सांग..
 • स्वच्छता निरीक्षक : हे सगळंच पाहण्यासाठी नेमलंय ना.. असं नाही की टायर खराब म्हणून तसंच जाऊ द्या.
 • चेतन बोरा : तू कोण आहे.. एसआय आहे ना? मग काय काम आहे तुझं?
 • स्वच्छता निरीक्षक : अरे तुरे मध्ये नका बोलू.. मी तुमच्याकडे नाही तर पालिकेकडे कामाला आहे.
 • चेतन बोरा : महापालिकेत कामाला असला तरी हरकत नाही. आम्हीही नागरिक आहोत. मीपण टॅक्स भरतो. मलाही माहितीय की तुमचं काय काम आहे ते?
 • स्वच्छता निरीक्षक : मी बोललो ना काय काम आहे?
 • चेतन बोरा : काय जबाबदारी आहे तुझी हे सांग ना..
 • स्वच्छता निरीक्षक : तुम्ही मला कशाला विचारता? तिथं टाकलं आहे तिथं विचारा..
 • चेतन बोरा : उद्याच टाकतो.. हरकत नाही..

महापालिका प्रशासन हे सहन करणार का?

- Advertisement -

कंत्राटी कामगारांनी असंख्य गंभीर आरोप करुनही महापालिका प्रशासनाने वॉटर ग्रेस कंपनीच्या वादग्रस्त ठेक्याबाबत काहीही भूमिका घेतली नाही. परंतु आता तर महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला थेट धमकावण्याच्या सुरात बोलत त्याला शिवीगाळ करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचीही तमाही ठेकेदाराच्या लेखी दिसत नाही. तरीही महापालिका प्रशासन मुकाटपणे हे सहन करणार का? महापालिका प्रशासनावर नक्की कुणाचा दबाव आहे? हे आणि असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -