घरमहाराष्ट्रनाशिकछट पूजेनंतर गोदाघाट परिसरातून तब्बल ६ टन कचऱ्याचे संकलन

छट पूजेनंतर गोदाघाट परिसरातून तब्बल ६ टन कचऱ्याचे संकलन

Subscribe

पंचवटी : गोदावरी नदीकाठी असलेल्या गंगाघाट, रामकुंड, कपिला संगम, तपोवन व नांदुर घाट परिसरातून छटपूजेच्या दुसर्‍या दिवशी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ६ टन कचरा संकलित केला. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने घनकचरा विभागाचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.३१) कचरा संकलनासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती.

छटपूजेच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संजय दराडे यांच्या वतीने छटपूजा आयोजकांसह भाविकांना प्रदूषणमुक्त छटपूजा साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअंतर्गत पूजा झाल्यावर पूजासाहित्य व निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलशाचा वापर करणे, नदी परिसरात प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर टाळणे, नदीत निर्माल्य, फुले, हार, कपडे, दिवे इत्यादी टाकू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुतांश भाविकांनी या सूचनांचे पालन केले. पूजाविधी झाल्यानंतर विभागीय अधिकारी कैलास राबडिया व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स यांच्या ५५ स्वच्छता कर्मचार्‍यांच्या माध्यमातून गंगाघाट परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तसेच, कपिला संगम व नांदुर घाट परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ५८ स्वच्छता कर्मचार्‍यांच्या माध्यमातून घाट परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी स्वच्छता मोहिमेतून अंदाजे ६ टन १०५ किलो निर्माल्य व इतर कचरा संकलित करुन पालिकेच्या पाथर्डी खत प्रकल्पावर रवाना करण्यात आला.

- Advertisement -

या स्वच्छता मोहिमेत श्री संत गाडगे महाराज कनोजिया धोबी समाज संस्थेचे संस्थापक सुरेश कनोजिया, व्यवस्थापक राजू कनोजिया, दीपक चव्हाण, स्वच्छता निरीक्षक नंदू गवळी, अनिल नेटावटे, बाळू जगताप, बी. के. पवार, चंद्रशेखर साबळे, विलास नाइकवाडे, कृष्णा शिंदे, संजय जाधव आदी स्वच्छता कर्मचारी सहभागी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -