घरमहाराष्ट्रनाशिकपवारांच्या सभेवरून राष्ट्रवादीत ‘यादवी’

पवारांच्या सभेवरून राष्ट्रवादीत ‘यादवी’

Subscribe

सभा अपयशी करण्यामागे झारीतील शुक्राचार्य : २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सिध्द पिंप्री येथे दस्तुरखुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांची प्रचार सभा घेण्यात आली खरी; मात्र सभेतील रिकाम्या खुर्च्यांनी पक्षाला मोठ्याच नामुष्कीला सामोरे जावे लागले. ही सभा यशस्वी करण्याची प्रामुख्याने जबाबदारी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची होती. मात्र, राष्ट्रवादीतील यादवी ऐनवेळेला उफाळून आल्याने सभेला गर्दी होणार नाही अशी रणनीती जाणीवपूर्वक आखण्यात आल्याची शंका पदाधिकार्‍यांकडून व्यक्त होत आहे. बाहुबली छगन भुजबळांभोवती वावरणार्‍या घरभेदींकडूनच हा प्रकार झाल्याची वंदता आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवाराला निवडून आणण्यापेक्षा सपाटून पाडण्यासाठीच प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा पक्षातच रंगू लागली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात समीर भुजबळांच्या उमेदवारीने ही निवडणूक छगन भुजबळांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. गत निवडणुकांचा अनुभव बघता यंदा कोणताही दगाफटका होऊ नये, याकरीता खुद्द छगन भुजबळांनीच नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेबरोबर जातीय प्रचाराचा फटका भुजबळांना बसला होता. त्यासोबतच त्यांच्या अवतीभोवती फिरणार्‍या चौकडीच्या चुकीच्या सल्ल्याचा फटकाही त्यांना तितकाच बसला. हा कटु अनुभव पाठीशी असलेल्या भुजबळांनी प्रचाराचे सुक्ष्म नियोजन केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रचार सभेने पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांमध्येही चैतन्य संचारेल अशा भावनेने सिद्ध पिंप्री येथे त्यांची सभा घेण्याचे ठरविण्यात आले. प्रत्यक्षात सभेची चर्चा जितकी झाली नाही त्यापेक्षा अधिक चर्चा सभेच्या अपयशाची झाली. अर्थात, ही चर्चा घडविण्यामागे भुजबळांच्याच निकटवर्तीयांचा हात असल्याची वदंता आहे.

- Advertisement -

सभेचे आठ दिवस अगोदरपासून नियोजन सुरू असताना पवारांच्या सभेला गर्दी होऊ नये, हे कसे होऊ शकते या कारणांचा शोध आता भुजबळांकडूनच घेण्यात येत आहे. सभेच्या अपयशावरून भुजबळांनी समर्थकांची चांगलीच झाडाझडती घेतल्याचेही समजते. मात्र, यातून काही धक्कादायक कारणे समोर आल्याचे कळते. अगोदरच मतदारसंघातील जनमत समीर भुजबळांसाठी अनुकुल नसताना त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले गेले. शरद पवारांनी स्वतः मराठा समाजातील नेत्यांची बैठक घेत भुजबळांसोबत राहण्याचे फर्मान सोडले, त्यामुळे कधीकाळी भुजबळविरोधी मानले जाणारे आज त्यांच्यासमवेत दिसून येत आहेत ही दिलासादायक बाब असली तरी, आता भुजबळांसोबत फिरणारेच त्यांना अडचणीत आणू पहात आहेत की काय, असे दिसते.

ज्या गावात पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती, त्या गावातील जनता सभेला येणारच नाही यासाठी जाणूनबुजून एका गटाकडून प्रयत्न केले गेल्याचे सांगितले जात आहे. ऐनवेळी व्यक्तिगत कारण पुढे करत अनेकांनी सभेकडे पाठ फिरवल्याचेही दिसून आले. एवढ्यावरच न थांबता सभा कशी फसली या चर्चेचे ‘पिल्लू’ही याच गटाकडून सोडण्यात आल्याचे समजते. भुजबळांच्या गळयातील ताईत बनून आपणच कसे आपले हितचिंतक आहोत हे दाखवण्यासाठीच हा सारा खटाटोप एका गटाकडून चालवला जात असल्याचेही दिसून येते. त्यामुळे आता भुजबळांनी वेळीच या समर्थकांना वेसण न घातल्यास २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज लावला जात आहे.

- Advertisement -

आतली बातमी

शरद पवारांची सभा निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीतून या सभेच्या नियोजनासाठी पुढाकार घेण्यास एकही पदाधिकारी पुढे येत नव्हता. त्यामुळे भुजबळांकडून काही समर्थकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. भुजबळांचा आदेश शिरसावंद्य मानत या गटानेही जोरदार तयारी सुरू केली. परंतु दुसरीकडे भुजबळविरोधी गटाने ही सभा अपयशी करण्यासाठी रणनिती आखत आपला डाव साधला. गेल्या वर्षानुवर्षापासून भुजबळांच्या गळयातले ताईत बनण्याच्या स्पर्धेतून ही खेळी खेळली गेली असली तरी पवारांपुढे मात्र भुजबळांची मान झुकली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -