घरक्राइमचोरी नव्हे, बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवारची सुपारी

चोरी नव्हे, बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवारची सुपारी

Subscribe

कॉलेज रोडवरील मोक्याची जागा हडपण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना अटक

कॉलेजरोडवरील मोक्याची तपस्वी बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित प्रकाश पवारने बांधकाम प्रकल्पांवरील कामगारांनाच ८ ते १० टक्के कमिशनची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपस्वी बंगल्यात घुसून वयोवृद्ध दाम्पत्यावर चाकूने हल्ला करून दागिने, रक्कम, कागदपत्रे, पासपोर्ट चोरणार्‍या चारपैकी दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, बिल्डरलाही अटक केली आहे. न्यायालयाने तिघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

बिल्डर अजित प्रकाश पवार (रा. लक्ष्मीनगर, कॉलेजरोड) यासह त्याचा साथीदार संदीप भारत रणबावळे (रा. शरणपूररोड), महादेव बाबूराव खंदारे (रा. डिसूझा कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी एका विधिसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे. तर अरुण उर्फ बबन गायकवाड, नंदकिशोर रणबावळे या संशयितांचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंगापूर पोलीस ठाणेहद्दीतील तपस्वी बंगल्यातील जबरी चोरीप्रकरणी गुन्ह्याची तातडीने उकल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार नाझीमखान पठाण व अप्पा पानवळ यांनी तांत्रिक विश्लेषणातून तपास केला. त्यांना संशयित गाडगे महाराज पुलाजवळ येणार असल्याचे समजले. वरिष्ठ निरीक्षक मधुकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार महेश साळुंके, रमेश कोळी, मिलिंद परदेशी, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे यांनी सापळा रचला. पोलिसांनी दुचाकी(एमएच १८ ई ६०८९)वरुन संशयित येताच त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी बिल्डरच्या सांगण्यावरुन वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन लूटमार केल्याची कबुली दिली.

दोन महिन्यापूर्वी बिल्डरची वयोवृद्ध दाम्पत्यास धमकी

संशयित बिल्डर पवार याने दोन महिन्यांपूर्वी तपस्वी बंगल्यात जात दाम्पत्यास घर खाली करण्याची धमकी दिली होती. मात्र, दाम्पत्य घर खाली करण्यास तयार नसल्याने पवारने कामगारांना हाताशी धरुन त्यांना ८ ते १० टक्के ‘कमिशन’ देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार रेकी करून चौघांनी लूटमार केली. यापूर्वीही तीन बिल्डरांनी तपस्वी दाम्पत्याला धमकावल्याचे पोलीस चौकशी समोर आले आहे. संशयित बिल्डरचे नाशिकमध्ये तीन बांधकाम प्रकल्प सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. शशीकुमार तपस्वींची दोन्ही मुले परदेशात आहेत. तपस्वी बंगल्यात ३५ वर्षांपासून दोघे राहतात. त्यांना धमकावून, मारुन त्यांचा बंगला व जागा हडप करुन नवीन प्रकल्प उभारण्याचा बिल्डरचा डाव असल्याचे तपासात समोर आले.

- Advertisement -

१६ एप्रिल रोजी तपस्वी दाम्पत्याला मारहाण

१६ एप्रिल २०२४ रोजी रात्री 10.30 वाजता बीवायके कॉलेजसमोरील तपस्वी बंगल्यात घुसून संशयितांनी वयोवृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण करुन जबरी चोरी केली. संशयितांनी शशीकुमार माधवराव तपस्वी (वय ७४) यांच्या बंगल्यातून सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम, डेबिट व क्रेडिट कार्ड, बँकेचे कागदपत्रे, पासपोर्ट, आधारकार्ड लंपास केले. पोलिसांनी सर्व कागदपत्रे, पैसे, दागिन्यांसह एक लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -