घरमहाराष्ट्रनाशिकव्ही. एन. नाईक संस्थेच्या निवडणुकीवर विधानसभेचे सावट

व्ही. एन. नाईक संस्थेच्या निवडणुकीवर विधानसभेचे सावट

Subscribe

आगामी विधानसभा निवडणूकपूर्वी जुलैमध्ये नाशिक जिल्ह्यात क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची निवडणूक होणार असल्याने नवइच्छुकांना धुमारे फुटले आहेत.

आगामी विधानसभा निवडणूकपूर्वी जुलैमध्ये नाशिक जिल्ह्यात क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेची निवडणूक होणार असल्याने नवइच्छुकांना धुमारे फुटले आहेत. संस्थेच्या काही पदाधिकार्‍यांना विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा असल्याने त्यांची कोंडी झाल्याचे दिसून येते.

नाशिक शहरासह सिन्नर, निफाड, दिंडोरी, येवला व नांदगाव या सहा मतदारसंघामध्ये संस्थेचे सुमारे ७२०० सभासद आहेत. नातेसंबंधांमध्ये संस्थेच्या निवडणुकीची वीण गुंफली जाते. मात्र, प्रत्येक उमेदवाराला राजी-नाराजी नाट्याचा सामना करावा लागतो. माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांनी संस्थेच्या निवडणुकीत हात घातला म्हणून समाजात पसरलेल्या नाराजीमुळे त्यांना दोन वेळा विधानसभेत पराभव पत्करावा लागला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांना देखील हाच अनुभव आला. तेव्हापासून संस्थेच्या निवडणुकीत सहभागी होणार्‍यांनी त्यानंतर येणार्‍या विधानसभा निवडणुकीपासून स्वताला अलिप्त ठेवले आहे किंवा ज्यांना बाहेर राजकारण करायचे आहे, ते संस्थेच्या निवडणुकीपासून दूर राहणे पसंत करतात. कोंडाजीमामा यांनी हा मूलमंत्र जतन करत फक्त संस्थेवर लक्ष केंद्रित केले आणि दिघोळेंच्या पॅनलचा दारुण पराभव केला. अर्थात, दिघोळेंचे खंदे समर्थक हेमंत धात्रक यांनी कोंडाजीमामांना समर्थपणे साथ दिल्यामुळे हे शक्य झाले. हेमंत धात्रक हे सरचिटणीस म्हणून तर, कोंडाजीमामा अध्यक्षपदी विराजमान झाले. या दोघांनाही आता विधानसभेचे वेध लागले आहेत. धात्रक हे नाशिकपूर्व मतदारसंघातून भाजपचे इच्छुक आहेत. तसेच, कोंडाजीमामा सिन्नरमध्ये पुन्हा पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संस्थेच्या निवडणुकीत स्वकियांचा रोष पत्कारण्याचे त्यांनी प्रकर्षाने टाळले; परंतु पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक नेतृत्व तयार झाले व त्यांना संस्थेत येण्याची मनीषा आहे. त्यांनी संस्थेच्या निवडणुकीसाठी आग्रही भूमिका मांडली.

- Advertisement -

येत्या १५ दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा यांनी केली. यात विद्यमान पदाधिकार्‍यांना ही निवडणूक लढवण्याची मनस्वी इच्छा आहे, पण पुढे होणार्‍या विधानसभा निवडणुकीवर त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही, याची काळजी त्यांना वाटू लागली आहे. विधानसभेची निवडणूक न लढणार्‍या उमेदवारांना संस्थेच्या निवडणुकीत पुढे करून प्रचारनिती आखली जाईल. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांचे पती उदय सांगळे यांचा ‘उदय’ होऊ शकतो. संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांचे ते निकटवर्तीय आहेत आणि सिन्नरमध्ये त्यांना किमान यंदा तरी निवडणूक लढण्याची इच्छा दिसत नाही. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनीही संस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्यासह विरोधी पॅनलचे पी. आर. गीते, बाळासाहेब पालवे, शांताराम गायकवाड यांनी पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू केल्यामुळे दोन पॅनलमध्ये ही निवडणूक पार पडेल, असे चित्र सध्या दिसते.

स्मरणरंजन

नाईक संस्थेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने २९ पैकी २८ जागांवर विजय संपादन केला. गेल्या पाच वर्षात संस्थेच्या रंणांगणात तयार झालेल्या दोघांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. संस्थेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस या चार प्रमुखपदांसह ६ विश्वस्त आणि उर्वरीत १९ तालुका संचालक म्हणून निवडून येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -