कळवणला हजारो शेतकर्‍यांचा ठिय्या

पुनद जलवाहिनीचे काम बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

kalwan-thiyya
धरणे आंदोलनानंतर तहसीलदार बंडू कापसे यांना निवेदन देताना कृती समितीचे सदस्य व कळवण, देवळा तालुक्यातील शेतकरी.

पुनद धरणातून सटाणा शहरासाठी सुरू करण्यात आलेल्या जलवाहिनीस शेतकर्‍यांचा दिवसेंदिवस वाढणारा विरोध लक्षात घेऊन शासनाने पाइपलाइनचे काम तत्काळ थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समिती सदस्य आणि कळवण व देवळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिला. सोमवारी ( दि.1) तालुक्यातील हजारो शेतकरी बांधवांनी प्रशासकीय इमारतीसमोर चार तास धरणे आंदोलन करून पाइपलाइन कामास विरोध करत प्रशासनाला निवेदन सादर केले.

सटाणा शहरासाठी पुनद धरणातून जलवाहिनीच्या कामाला शासनाने मान्यता दिल्यानंतर शेतकर्‍यांच्या विरोधामुळे हे काम रखडले होते. मात्र, मागील आठवड्यात जलवाहिनीस उच्च न्यायालयाने हिरवा कंदील देत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय योजनेस अडथळा आणणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या कामास पोलीस संरक्षणात युद्धपातळीवर सुरवात झाली असल्याने कळवण, देवळा तालुक्यातील शेतकर्‍यांसह जनतेमध्ये तीव्र रोष पसरला आहे. याचाच निषेध करत सोमवारी दोन्ही तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांनी कळवणच्या कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरच धरणे आंदोलन केले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष देविदास पवार, आमदार जे.पी गावित, जिल्हा परीषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शैलेश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, माकपचे सेक्रेटरी हेमंत पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, देवळ्याचे पंडित निकम, खामखेड्याचे अण्णा शेवाळे, संतोष मोरे, संदीप वाघ, काशिनाथ गुंजाळ, पंडित वाघ आदींनी मनोगत व्यक्त करीत जलवाहिनी कामाला विरोध केला. कळवण व देवळा तालुक्यातील जनतेच्या भावनांचा विचार करण्याची मागणी त्यांनी केली.शैलेश पवार यांनी न्यायालयीन प्रक्रियेची माहिती दिली.

यावेळी जयश्री पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, विलास रौंदळ, शीतलकुमार अहिरे, रामा पाटील, संभाजी पवार, बापू जगताप, मुन्ना वाघ, प्रवीण रौंदळ, शरद गांगुर्डे, जितेंद्र वाघ, किशोर पवार, मोहन जाधव, महेंद्र हिरे, टिनू पगार, बाळासाहेब शेवाळे, गोरख देवरे, जगन साबळे, संजय शेवाळे, कौतिक गांगुर्डे आदींसह शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सुमारे दोन ते अडीच हजार शेतकर्‍यांनी तब्बल चार तास प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या दिला. धरणे आंदोलनानंतर तहसीलदार बंडू कापसे, पोलीस उपाधीक्षक सदाशिव वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.

मागण्यांचा गांभिर्याने विचार करावा

कळवण व देवळा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. परिसरातील शेतकर्‍यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असल्याने शेतकर्‍यांच्या मागण्यांचा शासनाने गांभिर्याने विचार करावा. – देविदास पवार, अध्यक्ष, कृती समिती