घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक शहरात हेल्मेटसक्तीचा उडाला फज्जा

नाशिक शहरात हेल्मेटसक्तीचा उडाला फज्जा

Subscribe

पोलीस आयुक्तांनी मागवली कार्यालय प्रमुखांची नावे

नाशिक – शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासह जीवघेणे अपघात रोखण्यासाठी आता हेल्मेट नाही तर सहकार्य नाही या मोहिमेंतर्गत शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये येणार्‍या दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट नसलेल्यांना कार्यालयाच्या आवारात प्रवेश मिळाल्यास संबंधित आस्थापना, कार्यालयीन-विभाग प्रमुखावर कारवाई होणार आहे. मात्र, पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.८) या मोहिमेचा फज्जा उडाला. अनेक कार्यालयांमध्ये नियोजनाअभावी दुचाकीचालक विनाहेल्मेट आल्याचे आल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी खासगी, निमशासकीय व शैक्षणिक संस्थाचालकांना पत्र पाठवून संबंधित आस्थापनेच्या प्रमुख अधिकार्‍याचे नाव, पद आणि संपर्क क्रमांकाची माहिती १५ नोव्हेंबरपर्यंत मागवली आहे.

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी ८ नोव्हेंबरपासून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, सर्व वाहनतळ, औद्योगिक परिसर, शासकीय, निमशासकीय कार्यालये, कॅन्टोन्मेेंट बोर्ड येथे येणार्‍या दुचाकीचालकांना हेल्मेट सक्ती केली आहे. इमारतींच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसवण्यास सांगितले आहे. परिसरात येणार्‍या चालकांकडे हेल्मेट नसल्यास संबंधित कार्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

विनाहेल्मेट दुचाकीचालक कार्यालयांच्या परिसरात आल्यास संबंधित कार्यालयीन प्रमुखावर कारवाईची तरतूद पोलिस आयुक्तांनी केली आहे. त्यात संबंधितांवर दंडात्मक किंवा ८ दिवसांपर्यंत कारागृहात रवानगीच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, सोमवारी शहरातील विविध कार्यालयांमध्ये नियोजनाअभावी दुचाकीचालक विनाहेल्मेट आल्याचे दिसून आले. दिवाळीमुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह शैक्षणिक संस्था कार्यालये बंद होती. कार्यालये सोमवारपासून (दि.८) पुन्हा सुरु झाली आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक संस्थांमध्ये पत्र पाठवून कार्यालयीन प्रमुखाची माहिती मागवली आहे. ही माहिती १५ नोव्हेंबरपर्यंत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट दुचाकीचालक आल्यास संबंधित कार्यालयीन प्रमुखावर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस दररोज संबंधित सीसीटीव्हीची पाहणी करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -