घरमहाराष्ट्रनाशिकमहामार्गालगत अनधिकृत बांधकाम करणार्‍या हॉटेलचालकांचे धाबे दणाणले

महामार्गालगत अनधिकृत बांधकाम करणार्‍या हॉटेलचालकांचे धाबे दणाणले

Subscribe

विनापरवानगी बांधकामांबाबत मुख्याधिकार्‍यांनी दिली नोटीस

इगतपुरी : नगरपरिषद हद्दीत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गालगत हॉटेल व मोटेल चालकांनी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केली आहेत. अनेक तक्रारी आल्यानंतर मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांनी अनधिकृत बांधकाम करणार्‍या हॉटेल्सचा पाहणी दौरा केला. महामार्गावरील पिंप्रीसदो चौफलीजवळील केपटाउन व्हिलाज रहिवासी संकुलातही अतिक्रमणासह अनधिकृत बांधकाम आढळून आल्याने अशा मालमत्ताधारकांना बांधकाम काढण्यासाठी नोटीसा बजावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. ले-आऊट भागातही अतिक्रमण करत मनमानी पद्धतीने बांधकामे सुरु असल्याचे उघडकीस येत आहे. संबंधित रहिवासी संकुलच्या पार्किंग जागेत चक्क स्विमिंग पुल व कार्यालय बांधल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी अर्जानुसार पाहणी केली असता नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आली.

पुढील १५ दिवसांत अनधिकृत बांधकाम काढण्याची नोटीस बजावल्याने रहिवासी संकुल व्यवसायात खळबळ उडाली आहे. स्थानिक तक्रारीनुसार २ सप्टेंबरला मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांनी पथकासह बांधकामे तपासणी दौरा केला. यात काही रहिवासी संकुलातील ले-आऊट क्षेत्रातील बांधकामे बेकायदा आढळली. तर सर्वे नं. २२४/१, २२४/२ मधील भु. क्र. १, २ मधील केपटाउन व्हिलाज रहिवासी संकुलातील क्षेत्र ३५८७ चौ. मी. या मिळकतीला कोणत्याही प्रकारचे बांधकाम परवानगी न देणेबाबत नगरपरिषदेत तक्रार अर्ज प्राप्त आहे. मात्र, या क्षेत्रात वाहनतळ असलेल्या जागेत कार्यालय व स्विमिंग पुल अनधिकृत व नियमबाह्य बांधकाम आढळून आल्याने सबंधितांना नगरपरिषदेमार्फत नोटीस देण्यात आली. बेकायदा व अनधिकृत विनापरवानगी बांधकाम महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १८९ व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ अन्वये कारवाई करून होणार्‍या परिणामास संबंधित जबाबदार राहतील, असा इशाराही नोटिसीद्वारे दिला आहे. अशा अनधिकृत बांधकामांवर लवकरच कारवाई करणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -