घरमहाराष्ट्रनाशिक२४ लाखांच्या संशयास्पद व्यवहाराची चौकशी सुरू

२४ लाखांच्या संशयास्पद व्यवहाराची चौकशी सुरू

Subscribe

निवडणूक विभागाची कारवाई; व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

एक लाखांवरील रकमेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व बँक अधिकार्‍यांना दिलेले आहेत. त्यानुसार कळवण तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यातून एका व्यक्तीच्या खात्यावरून एकाच दिवशी २४ लाख ५० हजार रुपये इतर खात्यात वर्ग करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून आयकर विभागाने या व्यक्तीस नोटीस बजावली.

लोकसभा निवडणुकीच्या काळात मोेठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील सर्व बँकांना लाख रुपयांवरील व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तालुकानिहाय चार भरारी पथकांची नियुक्ती करून वाहनांची तपासणीही करण्यात येत आहे. निवडणूक काळात मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखवणे, पैसे वाटप करणे, असे प्रकार राजकीय पक्षांकडून होतात. त्यामुळे अशा आर्थिक उलाढालीवर निवडणूक विभागाकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात सटाणा येथून एका व्यापार्‍याच्या गाडीतून ७ लाख २० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच गुरुवारी (दि.४) कळवण तालुक्यातील ओतूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून बापू नारायण देवरे या व्यक्तीच्या खात्यावरून २४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे. इतकी मोठी रक्कम नेमकी कोणत्या कारणास्तव वर्ग करण्यात आली. या व्यक्तीचा व्यवसाय काय याबाबत निवडणूक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवण्यात आले असून आयकर विभागाने याची दखल घेत या व्यक्तीकडून याबाबत खुलासा मागवला आहे. आठवडाभरात रोख रक्कमेबाबत ही दुसरी तक्रार आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. नेमकी ही रक्कम कोणत्या कारणास्तव आणि कुणाला वर्ग केली गेली, हे चौकशीनंतरच उजेडात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -