विवाहात पाकळ्यांच्या अक्षता; वाचलेला तांदूळ गरिबांसाठी दान

सोनार- मोरे कुटुंबियांनी घालून दिला आदर्श; ‘पंचवटी लायन्स’च्या उपक्रमास मदत

Marriage
विवाहसोहळ्याप्रसंगी वधु-वरासह उपस्थित मान्यवर. याच सोहळ्यात वाचलेला तांदूळही स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला.

विवाहसमारंभात अक्षतांना धार्मिक महत्व असले तरीही याच समारंभात त्या पायदळीही तुडवल्या जातात. एकीकडे दुष्काळाच्या दाहकतेने अनेकांना अन्नाच्या कणा-कणाला मोहताज व्हावे लागत असताना दुसरीकडे अक्षतांची नासाडीही सुरू असते. ही बाब लक्षात घेऊन सोनार आणि मोरे यांच्या नाशिकमध्ये झालेल्या विवाह सोहळ्यात अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्या वाटण्यात आल्यात. महत्वाचे म्हणजे या कुटुंबांनी अक्षतांचा १०१ किलो तांदूळ गरिबांसाठी लायन्स क्लब ऑफ पंचवटीत दान केला.

राज्यभरात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी विभागांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागताहेत. दुष्काळामुळे अन्न- पाणी मिळणे मुश्किल होत असल्याने गावेच्या गावे आता शहराकडे स्थलांतर करताना दिसत आहेत. याच काळात लग्नसराई देखील सुरू आहे. दुष्काळाची झळ लग्नसराईला देखील बसली असून त्यामुळे समारंभातील बडेजावावर काही प्रमाणात मर्यादा आली आहे; परंतु परंपरांना फाटा देण्यास कुणी तयार होताना दिसत नाही. याला सोनार आणि मोरे कुटुंबीय अपवाद ठरले. मुळचे लोणी- प्रवरा येथील रहिवाशी संजय सोनार यांचा मुलगा कुणालचा विवाह संदीप मोरे यांची मुलगी माधुरीशी नुकताच नुकताच झाला. या दोन्ही कुटुंबांनी लग्न समारंभात तांदुळाच्या अक्षता न वाटता फुलांच्या पाकळ्या वाटल्या. लायन्स क्लब ऑफ पंचवटीतील धान्य बँक हा उपक्रम चालवणारे सुजाता कोहोक, वैद्य नीलिमा जाधव, रितू चौधरी, अरुण अमृतकर, मृणाल पाटील, यंदे , महेश सोमण यांनी उपक्रम राबवणार्‍यांचे मनभरुन कौतुक केले. हा उपक्रम सर्वांनी राबवावा, असे आवाहन केले. धान्य, तांदूळ वाया जाणार नाही आणि कोणाची तरी भूक शमवायला मदत करील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी क्लबचे सभासद रमेश चौटालिया, प्रवीण जयकृष्णीया, मनीष अहिरे, विभागीय अध्यक्ष राजेश कोठावदे, सुनील देशपांडे, दिनेश कोहोक, विनोद पाटील उपस्थित होते.

गरीबांचे उदर भरण होईल

अन्नधान्याची नासाडी थांबवण्यासाठी आपण कृतीशील सामाजिक संदेश देणे गरजेचे आहे, असे वाटत होते. मुलाच्या विवाहनिमित्त मी ही संधी साधली. अक्षता पायदळी तुडवण्यापेक्षा गरीबांचे उदर भरण होईल, या विचाराने आम्ही तांदूळ लायन्स क्लब ऑफ पंचवटीच्या धान्य बँकेला दान दिला. – संजय सोनार, वर पिता

संकल्पना अतिशय स्तुत्य

अक्षतांसाठी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून वाचलेला तांदूळ धान्य बंँकेला दान करण्याची संकल्पना अतिशय स्तुत्य आहे. अशा उपक्रमामुळे भारतभर धान्य बँका सुरू होण्यास निश्चितच मदत होईल. – वैद्य विक्रांत जाधव, माजी प्रांतपाल, लायन्स क्लब