कारमालकाचे अपहरण करत दफनविधी करण्याची धमकी

कारमालकाने कार मागितल्याच्या कारणातून चौघांनी मालकाचे अपहरण करत दफनविधी करण्याची धमकी दिल्याची घटना शालिमार व वाडीवर्‍हे गोंदे परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी येथील नितीश हिंगमिरे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित छोटा पठाण, गणेश महाले यांच्यावर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश हिंगमिरे यांची कार (एमएच १५-एफटी२७२१) छोटा पठाण, गणेश महाले यांच्यासह आणखी दोघांनी बळजबरीने घेतली. हिंगमिरे यांनी कार परत देण्याबाबत विचारणा केली असता चौघांनी आधी ५ लाख रुपये देण्याची मागणी केली. कार परत देण्याचे सांगून त्यांना शालिमार परिसरात बोलावले. त्यानुसार ते शालिमार येथे आले असता चौघांनी त्यांना बळजबरीने कारमध्ये बसविले. त्यांना वाडीवर्‍हे गोंदे परिसरात आणले. या ठिकाणी त्यांना चौघांनी मारहाण केली. कार विसरुन जायची नाहीतर तुझा दफनविधी करुन टाकीन अशी धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहिते करत आहेत.