घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलेव्ही प्रश्नी तोडगा नाहीच, बाजार समित्यांमधील लिलाव बंदच राहणार

लेव्ही प्रश्नी तोडगा नाहीच, बाजार समित्यांमधील लिलाव बंदच राहणार

Subscribe

न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रचलित पध्दतीने लिलाव सुरु करण्याचे आदेश

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल व मापारी यांच्यासाठी शेतकर्‍यांकडून घेण्यात येणारा कर (लेव्ही) कपात करण्यास व्यापार्‍यांचा विरोध कायम असल्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंदच राहणार आहेत. ‘लेव्ही’ संदर्भात तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यापारी, बाजार समित्यांचे सभापती व अधिकार्‍यांची बोलवलेल्या बैठकीत व्यापार्‍यांनी गोंधळ घातल्याने कुठलाही तोडगा निघाला नाही. तथापि, या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रचलित पध्दतीने लिलाव सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील मुख्य बाजार समित्या व उपबाजार आवारामध्ये गेल्या आठ दिवसांपासून शेतमाल लिलाव ठप्प आहेत. लिलाव सुरू व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी शर्मा यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.८) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बाजार समितीच्या माध्यमातून कामकाज करण्यास तयार आहोत. मात्र शेतकर्‍यांकडून कपात करणार नाही. जर कामकाज सुरू करायचे असेल तर हमाली, वाराई व तोलाई रोखीने कपात करू, असा व्यापार्‍यांनी मुद्दा उपस्थित केला. मात्र, असे केल्यास ही बाब कायद्यानुसार नाही, असे बाजार समिती प्रतिनिधींनी सांगितले. लेव्हीच्या मुद्द्यावर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना माथाडी मंडळाने व्यापार्‍यांना दिलेल्या नोटिसबद्दल बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने व्यापार्‍यांना वेळोवेळी मागण्या करूनही अडचणीत आणले आहे. एनसीसीएफ, नाफेड, एनसीईएल या संस्थांच्या माध्यमातून सरकारच व्यापार करत आहे. आमची गरजच काय, फक्त बैठका घेऊन आम्हाला बोलवले जाते. कुठल्याही न्याय मिळाले नाही. यापूर्वीही मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्या. मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही. आम्ही आमचे परवाने रद्द करतो, मात्र वेळोवेळी अन्याय सहन करणार नाही,असे मत व्यापारी प्रतिनिधींनी जिल्हाधिकार्यांसमोर मांडले. त्यामुळे बैठकीत निर्णयापेक्षा गोंधळच जास्त झाल्याचे बघायला मिळाले.

- Advertisement -

अखेर जिल्हाधिकार्‍यांनी सडेतोड भूमिका घेत प्रचलित नियमाप्रमाणे लिलाव सुरु करण्याचे आवाहन व्यापारी व माथाडी कामगार संघटनेला केले. यावेळी कामगार उपायुक्त विकास माळी, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलानी, लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, संचालक राजेंद्र डोखळे, नामपूरच्या सभापती मनिषा पगार, मनमाडचे सभापती दीपक गोगाड, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, नाशिक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे, लासलगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा, पिंपळगाव बसवंत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय बाफना, शरद जोशी प्राणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, दिलीप खोंड, संघटना सचिव सुनील यादव, कृष्णराव जगदाळे, बाजार समिती माथाडी कामगार संचालक नारायण पोटे, रमेश पालवे यांसह व्यापारी व माथाडी कामगार बैठकीला उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -