घरमहाराष्ट्रनाशिकमुक्त विद्यापीठात मराठी भाषा भवन उभारणार

मुक्त विद्यापीठात मराठी भाषा भवन उभारणार

Subscribe

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु असताना राज्य सरकारने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. विशेष म्हणजे पुढील मराठी राजभाषा दिनापूर्वीच या भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री सामंत यांनी केली.

शिवसेनेच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी व शिवसैनिकांशी सोमवारी (दि.28) सायंकाळी संवाद साधला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील पाटील, उपनेते सुनील बागूल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे उपस्थित होते.

- Advertisement -

मंत्री सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोउल्लेख टाळत भाजपला टोला लगावला. दररोज सकाळी 8 वाजेला टिव्ही समोर येणारे पंतप्रधान मराठी भाषा दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावर त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहणार आहे. तत्पूर्वी, नाशिकमधील मुक्त विद्यापीठात मराठी भाषा भवन उभारणार आहे. पुढील मराठी भाषा दिनापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करुन कामास प्रारंभ करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

परीक्षा ऑफलाईनच!

अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पध्दतीनेच होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. परंतु, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -