घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबाजार समिती : प्रवेशद्वार उघडा अन्यथा कुलूप तोडू; विरोधक अन् व्यापारी आक्रमक

बाजार समिती : प्रवेशद्वार उघडा अन्यथा कुलूप तोडू; विरोधक अन् व्यापारी आक्रमक

Subscribe

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना जाण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार एक दिंडोरी रोडकडील मुख्य प्रवेशद्वार तर दुसरा म्हणजे पेठरोडकडून निमाणीकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूने इंद्रकुंडाकडील बाजूचा प्रवेशद्वार. मात्र गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून बाजार समितीमध्ये जाणार्‍या दुसरे हॉटेल गोंधळच्या बाजूचे प्रवेशद्वार बाजार समितीकडून कुलूप बंद केल्याने शेतकरी, व्यापारी वर्गासह येथील व्यावसायिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसात मार्केट यार्डाचे बंद केलेले दक्षिणेकडील प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुले न केल्यास बुधवारी कुलूप तोडण्याचा इशारा विरोधी गटाचे संचालक शिवाजी चुंभळे आणि त्यांच्या संचालकांनी दिला आहे.

काही व्यावसायिकांनी संचालक शिवाजी चुंभळे यांची भेट घेत आपली कैफियत मांडली. संचालक शिवाजी चुंभळे, प्रल्हाद काकड, तानाजी करंजकर, धनाजी पाटील यांनी याबाबत सोमवार (दि.१०) रोजी बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांची भेट घेऊन प्रवेशद्वार उघडण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात दोन दिवसात प्रवेशद्वार शेतकर्‍यांसाठी खुले केले नाही तर बुधवारी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून शेतकर्‍यांसाठी बाजार समिती खुली करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे सभापती पिंगळे हे प्रवेशद्वार उघडणार कि चुंभळे यांना कुलूप तोडावे लागणार याकडे शेतकरी आणि बाजार समिती घटकांचे लक्ष लागले आहे.

सभापती पिंगळे यांची गाडी अडकली म्हणून आज एक प्रवेशद्वार बंद केले. उद्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांची कोंडी झाली तर ते बाजार समितीला कुलूप लावणार का ? बाजार समिती शेतकरी, व्यापारी, नागरिक यांच्यासाठी असून कोणाची खासगी मालमत्ता नाही. बाजार आवारात नेहमीच वाहनांची होणारी गर्दी बघता बाजार समितीने बेकायदेशीरपणे नेमणुक केलेले सुरक्षारक्षक काय काम करतात असा प्रश्न निर्माण होतो. अशा पद्धतीने मनमानी खपवून घेतली जाणार नाही. दोन दिवसात प्रवेशद्वार शेतकरी हितासाठी उघडले नाहीतर बुधवारी कुलूप तोडून शेतकर्‍यांचा मार्ग सुखकर करणार. :  शिवाजी चुंभळे, (संचालक, ना.कृ.ऊ बाजार समिती)

- Advertisement -

प्रवेशद्वार उघडण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन

दरम्यान, बाजार समितीच्या बाहेरील बाजूस असलेल्या व्यापार्‍यांकडून सोमवार (दि.१०) रोजी बाजार समितीकडे जाणार्‍या रस्त्यावर दोर्‍या बांधून निषेध नोंदविण्यात आला. काही दिवसांपूर्वी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे बाजार समितीच्या कार्यालयात याच प्रवेशद्वाराने येत असताना रस्त्यात उभ्या केलेल्या वाहनांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत पिंगळेंसह काही शेतकर्‍यांची वाहने अडकली होती. त्यामुळेच या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. मात्र या प्रवेशद्वारा जवळील अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला आहे तसेच या ठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यावर गाडी लावत असल्याने बाजार समितीत येताना मोठ्या प्रमाणात अडचण होते या कारणाने रस्ता बंद केल्याचे दुकानदारांना बाजार समितीतून सांगण्यात आले. यावर उपाय म्हणून सर्व दुकानदारांनी एकत्र येत प्रवेशद्वारा लगत असणारी सर्व दुकाने काही काळ बंद ठेवून ज्या दुकानदारांनी अतिक्रमण केलेले होते ते त्यांनी काढून घेतले आहे. तर काही दुकानदार अतिक्रमण काढत नसल्याने व इंद्रकुंडाच्या बाजूने या दुकानात ग्राहक येत असल्याने सर्व दुकानदारांनी मिळून पुढील बाजूने दोर्‍या बांधून रस्ता बंद केला होता. यानंतर अतिक्रमण बाकी असलेल्या दुकानदाराने तेथील अतिक्रमण काढून घेतले असून रस्ता मोकळा करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -