घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबिल्डर नरेश कारडांच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये धनदांडग्यांची सर्वाधिक गुंतवणूक

बिल्डर नरेश कारडांच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये धनदांडग्यांची सर्वाधिक गुंतवणूक

Subscribe

कारडा फसवणूकप्रकरण : बदनामीच्या भीतीने नामांकित गुंतवणूकदार लेखी तक्रारीऐवजी देताहेत तोंडी तक्रारी, दिवसभरात पोलिसांकडे आल्या पाच लेखी तक्रारी अन् १० तोंडी तक्रारी

व्यावसायिक प्रकल्प व गृहप्रकल्पांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक व कारडा कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष नरेश कारडांविरोधात पोलिसांकडे गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. गुंतवणूकदारांमध्ये सरकारी अधिकारी व कर्मचारी, वकील, वैद्यकीयसह विविध क्षेत्रातील व्यक्ती आहेत. सर्वाधिक गुंतवणूकदार धनदांडगे आहेत. विशेष म्हणजे, समाजात बदनामी व्हायला नको आणि कोट्यवधी रुपयांच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेकजण पोलिसांकडे लेखी तक्रारींऐवजी तोंडी तक्रारी करत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांनी अशोका मार्ग परिसरात २०१९ मध्ये बांधकाम प्रकल्प सुरू केला होता. या बांधकाम प्रकल्पातील दोन गाळ्यांसाठी राहुल जयप्रकाश लुणावत व त्यांचा भावाचा सासरा सुनील कोठारी यांना दोन गाळे कारडा देणार होते. त्यासाठी कारडांनी लुणावत व कोठरींकडून १ कोटी २० लाख रुपये घेतले होते. रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरूवात होत नसल्याने लुणावतांनी कारडांकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची दिली. त्यातून फसवणूक झाल्याचे लुणावतांच्या लक्षात आले. याप्रकरणी राहुल लुणावत यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर सोमवारी (दि.३०) रात्री कारडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने मंगळवारी (दि.३१) कारडांना ३ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त भगीरथ देशमुख करीत आहेत.

  • नाशिक शहरातील नामांकित बिल्डर असल्याने गृहप्रकल्पांमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करत नरेश कारडांना थेट ७२ लाख ते ३ कोटी रुपये बँक खात्यांवरून दिल्याचे समोर आले आहे.
  • शहरातील नामांकित वकिलाने कारडांना ७२ लाख रुपये दिले असून, पोलिसांनी कारडांना अटक केल्याचे समजताच वकिलांसह त्यांच्या पत्नीने पोलिसांशी संपर्क साधून तोंडी तक्रार दिली.
  • अनेक गुंतवणूकदारांनी काळा पैसा कारडांच्या गृहप्रकल्प व व्यावसायिक प्रकल्पांमध्ये गुंतवला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे काही तक्रारदार तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे तपासात समोर आले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -