लाट टिकवण्यासाठी नाशिक काँग्रेसचे ‘हायटेक‘ नियोजन!

तीन राज्यांमधल्या भाजपच्या पीछेहाटीनंतर काँग्रेसने जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून नाशिकमध्ये आता सोशल मीडियासाठी वॉर रूम देखील तयार करण्यात आली आहे.

Congress

नाशिक तीन राज्यांमध्ये भाजपचा झालेला दारुण पराभव बघता काँग्रेसमध्ये उत्साहाची लाट संचारली असून आगामी निवडणुकांतही ही लाट टिकून राहण्यासाठी आता ‘हायटेक’ नियोजन सुरु झाले आहे. याचाच एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक शहरात जिल्हास्तरीय ‘वॉर रुम’ तयार करण्यात येणार आहे.

बुथ रचनेपासून सोशल मीडियात पोस्ट करण्यापर्यंतची कामे केली जातील. विशेष म्हणजे यात काम करणार्‍या कार्यकर्त्यांना वेतन दिले जाणार आहे. त्यामुळे या कार्यालयात ‘बिन पगारी आणि फुल अधिकारी’ अशी अवस्था कर्मचार्‍यांची नसेल.

लोकसभा निवडणूक मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने काँग्रेसच्या गोटातही हालचाली सुरु झाल्या आहे. स्थानिक पातळीवर पक्षाला गटबाजी आणि पदाधिकार्‍यांच्या उदासिनतेला सामोरे जावे लागत असल्यामुळे आता वरिष्ठांनीच प्रचाराची सूत्रे हाती घेतल्याचे दिसते. याची मुहूर्तमेढ ‘वॉर रुम’च्या उभारणीपासून रोवली जाणार आहे. आजवरचा अनुभव बघता प्रचारासाठी केवळ कार्यकर्त्यांवर विसंबून राहिल्यास अनेकदा हिरमोड होतो. शिवाय, कार्यकर्ते पक्षासाठी पूर्णवेळ देऊ शकत नसल्याने निवडणुकीत ऐनवेळी अडचण निर्माण होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विशेषत: सोशल मीडियासाठी व्यावसायिक तज्ज्ञांची नियुक्ती काँग्रेसच्या वतीने केली जाणार आहे.