कोरोनाकाळात मदत हवी? महापालिकेशी असा साधा संपर्क

corona test

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. संशयित रूग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले जात असून रूग्ण बाधित आढळून येताच त्यास उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले जात असून योग्य ते उपचार केले जात आहेत. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तत्काळ मदतीसाठी नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोना आपत्कालीन हेल्पलाईन ०२५३-२३१७२९२, ९६०७४३२२३३, ९६०७६०११३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यास 24×7 मदत मिळणार आहे. नागरिकांनी हेल्पलाईनचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केले आहे.

नाशिक महापालिकेच्या वतीने शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या असून त्यानुसार लक्षणे नसलेली, अति सौम्य अथवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेली बाधित व्यक्तींना घरगुती अलगीकरण करण्याबाबत सुचित केले जात आहे. त्यानुसार घरामध्ये स्वतंत्र राहण्याची खोली असणे आणि घरी काळजीवाहू व्यक्ती उपस्थित असणे, अशा प्रकारच्या बाबी असल्यास घरगुती अलगीकरण करण्यात यावे, अशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार नाशिक महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कार्यवाही सुरू केली जात आहे. नागरिकांना यापूर्वी जी भीती वाटत होती की, आपण बाधित झालो किंवा कोरोनाबधितांच्या संपर्कात आलो तर डॉक्टर आपल्याला घेऊन जातील. तपासणी नमुने झाल्यानंतर रिपोर्ट येईल. त्याप्रमाणे पुढची कार्यवाही होईल, अशी भीती मनात निर्माण करण्याचे काही कारण नाही. निर्देशाप्रमाणे रुग्णांना अथवा संपर्कातील नागरिकांना भरती न करता अशा घरगुती अलगीकरणात ठेवून तपासणी अथवा उपचार करण्यात येणार आहेत, डॉ. त्र्यंबके यांनी सांगितले.