घरमहाराष्ट्रनाशिकपहिल्या श्रावणी सोमवारी शिवमंदिरे दुमदुमली, भाविकांचा महापूर

पहिल्या श्रावणी सोमवारी शिवमंदिरे दुमदुमली, भाविकांचा महापूर

Subscribe

नाशिक : गंगाघाटावर असलेल्या पुरातन व प्रसिद्ध अशा कपालेश्वर मंदिर, सोमेश्वर, पाताळेश्वर, बाणेश्वर, नारोशंकर अशा विविध महादेवाच्या मंदिरांमध्ये श्रावणातील पहिल्या सोमवारी (दि.२०) पहाटेपासूनच प्रचंड गर्दी झाली होती. हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजराने गोदाघाटचा परिसर दुमदुमला होता. दूध, बेल, बेलफळ, हार फुले व तांदूळची शिवामठ अर्पण करून महिला मनोभावे पूजन करत होत्या. बेल पानाने दिवसभर महादेवाला अभिषेक सुरू होता. तर, व्रतधारी भाविक रामकुंडात स्नान करून शिव मंदिरात पूजेसाठी जात असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

रामकुंड परिसरातील प्राचीन व प्रसिद्ध असलेल्या भगवान कपालेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी राज्यासह जिल्ह्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी कपालेश्वर संस्थानच्या वतीने श्रावण महिन्यात दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कपालेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कपालेश्वर शिवपिंडीवर सोमवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास अभिषेक, रुद्राभिषेक व पूजा अर्चा करून मंदिर भाविकांना
दर्शनासाठी खुले करण्यात आले.

- Advertisement -

दुपारी एक वाजता कपालेश्वर शिवपिंडीवर जलाभिषेक करून शृंगार करण्यात आला. पानाफुलांची आकर्षक सजावट केलेली कपालेश्वर महादेवांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री १० वाजता पालखीचे मंदिरात आगमन झाल्यावर महाआरती करण्यात आली.

कपालेश्वराचा पंचमुखी मुख्यवट्याची मिरवणूक लक्षवेधी  

महादेवाचा पंचमुखी मुखवटा हा वर्षभरात केवळ सोमवती आमावास्या, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र याच दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो. परंपरेनुसार चांदीच्या पंचमुखी महादेव मुखवट्यांची पालखी काढली जाते. दुपारी कपालेश्वर मंदिरात मुखवटा आणल्यानंतर दुपारी ४.३० वा. पालखी सोहळा सुरू केला गेला. पालखी कपालेश्वर मंदिरातून निघून मालवीय चौक, शनी चौक, राममंदिर पूर्व दरवाजा, सरदार चौक, मुठे गल्ली तेथून पुन्हा शनी चौकातून रामकुंडावर सायंकाळी सातला पालखी आली. त्यानंतर रामकुंडावर दूध, दही, मध, उसाचा रस याचा अभिषेक करण्यात आला. महाआरतीनंतर पंचमुखी मुखवटा मंदिरात नेण्यात आला.

- Advertisement -

वाहतूक मार्गात बदल 

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त रामकुंडाच्या दिशेने येणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. मालेगाव स्टँड, इंद्रकुंड, खांदवे सभागृह, सरदार चौक आदी मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मार्ग वाहनांना बंद करण्यात आले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -