घरताज्या घडामोडीवेळेचे निर्बंध हटविल्यानंतरही दुकाने सक्तीने केली बंद

वेळेचे निर्बंध हटविल्यानंतरही दुकाने सक्तीने केली बंद

Subscribe

प्रशासनात समन्वयाचा अभाव : व्यावसायिकांमध्ये संभ्रम

कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील दुकाने सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने वेळेचे निर्बंध मागे घेतल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. त्यानूसार आज सकाळपासूनच सम – विषम तारखेच्या फॉर्म्युल्यानूसार दुकाने सुरू करण्यात आली. मात्र सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मेनरोड परिसरातील दुकाने पोलीसांनी सक्तीने बंद करण्यास सांगितल्याने पोलीस आणि व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी प्रशासनातच समन्वय नसल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली. त्यामुळे दुकानांच्या वेळेबाबत पुन्हा एकदा संभ्रम वाढला आहे.

शहरातील दुकाने सम-विषम तारेखनूसार सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू असल्याने नागरिक वस्तुंचा संचय करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करतात, त्यामुळे करोनाचा धोका अधिकच वाढण्याची शक्यता लक्षात घेता याबाबत शासकीय अधिसूचनेतील तरतुदीचा वापर करून दुकानांची वेळ वाढवल्यास गर्दी विखुरली जाउन सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे सुकर होईल असे प्रशासन प्रमुखांचे मत पडले. त्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या संयुक्त बैठकीत बाजारपेठेत होणार्‍या गर्दीचा आढावा घेत सर्व दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी असेलेले पूर्वीचे वेळेचे निर्बंध मागे घेण्यात आले. त्यामुळे आता शहरातील बाजारपेठा रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला. अगोदरच लॉकडाउनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात पुन्हा सम विषम तारखेचा फॉर्म्युल्यानूसार महीन्यातून केवळ पंधराच दिवसच तेही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याची मुभा असल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. व्यावसायिकांना दिलासा देत प्रशासनाने वेळेचे निर्बंध मागे घेतले. त्यानूसार गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यात आली. एरव्ही सायंकाळी ५ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने चार वाजेनंतर दुकानदार आवरासावर सुरू करतात मात्र नव्या निर्देशानूसार आज पाच वाजेनंतर दुकाने सुरू ठेवण्यात आली. मात्र अचानक साडेपाच वाजेच्या सुमारास पोलीसांनी मेनरोड परिसरातील दुकाने सक्तीने बंद करण्यास भाग पाडले. यामुळे व्यापारी आणि पोलीस प्रशासनात बाचाबाचीही झाली. प्रशासनाच्या निर्देशानूसारच आपण दुकाने खुली ठेवल्याचे व्यापार्‍यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. दुकाने बंद करा अन्यथा गुन्हे दाखल करू असा इशारा यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी दिल्याने हा वाद अधिकच वाढत गेला. अखेर पोलीस यंत्रणेने ही दुकाने सक्तीने बंद करण्यास भाग पाडले. अगोदरच सम विषम तारखेबाबत संभ्रम निर्माण झालेला असतांना आता वेळेबाबत प्रशासनानेच निर्देश देउनही दुकाने सक्तीने बंद करण्यात आल्याने प्रशासनातील समन्वयाचा अभाव दिसून आला.

- Advertisement -

कंटेनमेंट झोन मधील दुकानांसाठी वेळेचे निर्बंध कायम आहेत. कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने सुरू राहू शकतात. याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली आहे त्यानूसार ते पोलीस अधिकार्‍यांना सुचना देत आहेत.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

शहरातील बाजारपेठांमध्ये गुरूवारी काही ठिकाणी दुकाने सायंकाळी पाच वाजेदरम्यान बंद करण्यात आली असली तरी गर्दीच्या पार्श्वभुमीवर ती दुकाने बंद करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्यानूसार वेळेचे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यानूसार ही दुकाने सुरू राहणार आहेत.
विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -