घरमहाराष्ट्रनाशिकसत्तेच्या हव्यासापोटी होळकरांवर गंडांतर

सत्तेच्या हव्यासापोटी होळकरांवर गंडांतर

Subscribe

लासलगाव बाजार समितीत सत्ताधारी-विरोधी गटातील १३ सदस्य एकत्र

लासलगाव बाजारपेठांमध्ये अग्रगण्य लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभपती संदीप दरेकर यांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला तरी राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे सत्ताधारी व विरोधी गटातील संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. केवळ सत्तेच्या हव्यासापोटी सभापती, उपसभापतींवर हे गंडांतर आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गटाच्या संचालकांनी एकत्र येऊन अचूक टायमिंग साधला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 11 मे 2016 रोजी पार पडली. नेमके याच काळात भुजबळांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केल्यामुळे छगन भुजबळ तुरुंगात गेले. त्यामुळे निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली जयदत्त होळकर आणि पंढरीनाथ थोरे यांनी एकत्र शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली. यात जयदत्त होळकर, संदीप दरेकर, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, सचिन ब्रम्हेचा, अशोक गवळी, रमेश पालवे, बाळासाहेब क्षीरसागर, शिवनाथ जाधव, प्रीती बोरगुडे असे 11 सदस्य निवडून आले. बाजार समितीचे तत्कालीन सभापती नानासाहेब पाटील, सुरेश पाटील आणि काँग्रेसचे राजाराम पानगव्हाणे यांनी बळीराजा पॅनलची स्थापना केली. यात नानासाहेब पाटील, वैकुंठ पाटील, भास्कर पानगव्हाणे, मोतीराम मोगल, नंदकुमार डागा, सुवर्णा जगताप, अनिता सोनवणे विजयी झाले.

- Advertisement -

निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सभापती निवडीच्या दरम्यान खुद्द आमदारांनी अडीच वर्षे जयदत्त होळकर सभापतीपदावर राहतील, तर अडीच वर्षे पंढरीनाथ थोरे सभापती होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सभापतीपदी जयदत्त होळकर तर उपसभापती सुभाष कराड यांची निवड झाली. त्यानंतर आर्वतन पद्धतीनुसार उपसभापती सुभाष कराड यांनी राजीनामा दिल्याने 14 डिसेंबर 2017 रोजी उपसभापतीपदी संदीप दरेकर यांची निवड झाली. मात्र, कार्यकाळ पूर्ण होऊनही जयदत्त होळकर यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे पंढरीनाथ थोरे यांनी अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विरोधी गटातील संचालकांना एकत्र केले. सत्ताधारी गटातून सहा सदस्य विश्वासात घेत विरोधी गटाच्या सदस्यांच्या मदतीने सभापती जयदत्त होळकर, उपसभापती संदीप दरेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. तथापि, अडीच वर्षांचा कार्यकाळ निश्चित झालेला असताना केवळ सत्तेसाठी शब्द फिरवल्यामुळे विरोधी गटातील सदस्यांना चाल खेळण्याची संधी मिळाली आहे. सोबत निवडणुका लढवणारे सदस्य विरोधात गेल्यामुळे सभापती व उपसभापतींची गच्छंती अटळ मानली जात असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी या घडामोडींना वेग आला आहे. त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणे औस्युक्याचे ठरेल.

तिसर्‍यांदा अविश्वास ठराव दाखल

सन 1988 मध्ये सभापती पोपटराव रामचंद्र जाधव, उपसभापती शंकरराव कुटे यांच्यावर दाखल झालेला अविश्वास ठराव मंजूर झाला होता. तर 1994 मध्ये तानाजी बनकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता; मात्र, ठरावाच्या मतदानावेळी पुरेशी सदस्यसंख्या नसल्याने ठराव नामंजूर झाला होता. आता विद्यमान सभापती जयदत्त होळकर, उपसभापती संदीप दरेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला आहे. त्याचा काय निकाल लागणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -