घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तासभर झाली चर्चा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तासभर झाली चर्चा

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी सकाळी जवळपास तासभर सविस्तर अशी राजकीय चर्चा झाल्याचे कळते. मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीआधीच शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यात मनसुख हिरेन प्रकरणाच्या निमित्ताने मुंबई पोलिस दलातील सचिन वाझेंच्या अटकेचे प्रकरण गाजत आहे. याच विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचे कळते. एकंदरीतच या प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा झाल्यानेच आता राज्य सरकारच्या मदतीलाच शरद पवार धावून आल्याचे बोलले जात आहे. एकुणच राज्यातील राजकीय परिस्थितीवर या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही विरोधी पक्षाने सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केले होते. या प्रकरणात सचिन वाझेंच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती. तसेच सचिन वाझे यांना मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यावर खुलासा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे आणि शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच सचिन वाझे म्हणजे ओसामा बीन लादेन नाहीत असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते. शरद पवार यांनीही रविवारी सचिन वाझेंच्या प्रश्नावर उत्तर देताना हा विषय राज्याचे आणि सरकारचे धोरण ठरवणारा नसल्याचे सांगत या विषयाला बगल दिली होती. त्यानंतरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीआधी झालेली शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या दरम्यानची भेट ही महत्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

सरकारला धोका निर्माण होऊ नये, तसेच सरकारची प्रतिमा या संपुर्ण प्रकरणात मलिन होऊ नये यासाठी तारणहार म्हणून शरद पवार यांच्या भूमिकेकडे सध्या पाहिले जात आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची एकंदरीतच असलेली प्रतिमा पाहता डॅमेज कंट्रोलसाठीच शरद पवार हे ठाकरे सरकारच्या मदतीला धावून आले असल्याचे बोलले जात आहे. सरकारची जनसामान्यांमध्ये होत असलेली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणूनच ठाकरे सरकारच्या बचावासाठी आता शरद पवार उतरले असल्याची चर्चा आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -