घरठाणेNCP Crisis : 'राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचीच', ठाण्यात झळकले बॅनर

NCP Crisis : ‘राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचीच’, ठाण्यात झळकले बॅनर

Subscribe

ठाणे : शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काल, रविवारी मोठी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. तर दुसरीकडे, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनार्थ ठाण्यात बॅनर झळकले आहेत.

वर्षभरापूर्वी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या सरकारने दोन दिवसांपूर्वी वर्षपूर्तीचा सोहळा साजरा केला. त्यानंतर काल, रविवारी पुन्हा एकदा राजकारणात भूकंप झाला असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थक आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सहभागी झाला आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत पक्षाची भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. सिंचनात घोटाळा झाला आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. पण आज मला आनंद झाला आहे, कारण राष्ट्रवादीच्या आमदारांना सत्तेत घेऊन मोदी यांनी पक्षाला क्लिनचीट दिली आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

या पार्श्वभूमीवर सोमवार ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कॅडबरी सिग्नल येथे ‘राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचीच’ अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्या बॅनरवर शरद पवार यांच्या छायाचित्रासह ‘आले किती गेले किती, त्याची कोणाला भीती’ अशी ओळ मोठ्या अक्षरांत पाहायला मिळते. या बॅनरवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह नवनियुक्त ठाणे शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचीही नावे आहेत. यावरून हे बॅनर आव्हाड यांच्या समर्थकांनी लावल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दुसऱ्या एका बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कळवा असा उल्लेख असून माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. ‘आम्ही सर्व शरद पवार साहेबांसोबतच, आमच्या नावाचा कोणीही गैरवापर करू नये,’ असे त्यावर नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

ठाण्यात राष्ट्रवादीचे नवे पदाधिकारी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत, आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सुहास देसाई आणि कार्याध्यक्षपदाची जबाबदारी परिवहन समिती सदस्य प्रकाश पाटील हे सांभाळतील, असे म्हटले आहे. ही नियुक्ती शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर काही तासांतच शहरात बॅनर झळकले.

एकनिष्ठचे बॅनर
महापालिका मुख्यालयासमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्त झाल्याने बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर ‘एकनिष्ठ’ यासह ‘सदैव साहेब आपल्यासोबत…’ अशी ओळ आहे. त्यावर शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आव्हाड यांचे छायाचित्र आहे. तसेच हा बॅनर संदेश प्रभू यांनी आपल्या छायाचित्रासह लावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -