घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमराठवाड्यातील कार्यकर्त्यांची थोरल्या पवारांना साथ, आमदारांनी धरला अजितदादांचा हात

मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची थोरल्या पवारांना साथ, आमदारांनी धरला अजितदादांचा हात

Subscribe

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवार प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. मराठवाड्याने शरद पवारांना त्यांच्या पडत्या काळात साथ दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट मराठवाड्यात आमने-सामने आलेले दिसत आहेत. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 आमदार आहेत. विधानसभेत 8 आणि विधान परिषदेवर राष्ट्रवादीचे मराठवाड्यातून ३ आमदार आहेत. यापैकी विधानसभेचे 5 आणि विधान परिषदेचे 2 आमदार अजितदादांसोबत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. उर्वरित विधानसभेचे 3 आणि विधान परिषदेचा एक असे चार आमदार थोरल्या पवारांसोबत आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार बीडमध्ये 
मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार बीड जिल्ह्यात आहेत. त्यामुळेच कदाचित शरद पवारांनी (Sharad Pawar) पक्ष फुटीनंतरची दुसरी सभा बीडमध्ये आयोजित केलेली दिसत आहे. मात्र बीडमधील मातब्बर नेत्यांपैकी एक असलेले आणि आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  हे अजित पवारांसोबत (Ajit Pawar) आहेत. अजित पवारांना भाजपसोबत सरकारमध्ये सामिल होण्यास सर्वाधिक प्रोत्साहित करणारे धनंजय मुंडे हेच असल्याचेही बोलले जाते. तर वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून 1978 मध्ये मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांसोबत राहिलेले तत्कालिन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पूत्र माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) आता अजित पवारांसोबत आहेत. पाटोद्याचे आमदार बाळासाहेब अजबे देखील धाकल्या पवारांच्या छावणीत आहेत.

- Advertisement -

तर बीडचे तरुण आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांनी थोरल्या पवारांची साथ सोडलेली नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील चार पैकी तीन आमदार अजित दादांसोबत तर फक्त एक आमदार शरद पवारांसोबत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
संघटनेबद्दल बोलायचे झाल्यास बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर हेही अजितदादांसोबत आहेत.

सभा शरद पवारांची चर्चा बॅनरची 
बीडमध्ये सभा शरद पवारांची आहे, मात्र चर्चा सध्या एका बॅनरची होत आहे. सहाजिकच हे बॅनर अजित पवार समर्थक मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनानेच लागले आहे. या बॅनरच्या माध्यमातून अजितदादांना पवारांनी आशीर्वाद द्यावा अशी भावनिक साद घालण्यात आली आहे.

- Advertisement -

मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही आमदार नाही. विधान परिषदेवर शिक्षक आमदार विक्रम काळे आणि पदवीधर आमदार सतीश चव्हाण या दोघांनीही अजित पवारांना पाठिंबा दिलेला आहे. सतीश चव्हाणांना यंदा मंत्रीपदाची इच्छा आहे, त्यामुळे ते अजितदादांसोबत आहेत, हे उघड आहे. औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील अजित पवारांच्या गोटात सामिल झाले असले तरी संघटनेतील माजी आमदार किशोर पाटील, विजय अण्णा बोराडे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, शहराध्यक्ष शरफोद्दीन हे पदाधिकारी दोन दिवसांपासून मोठ्या पवारांसोबत इमानेइतबारे दिसले आहेत.

माजी मंत्री सावलीसारखे पवारांसोबत 
जालन्यातून राजेश टोपे (MLA Rajesh Tope) हे एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते शरद पवारांचे निष्ठावान असल्याचे पहिल्या दिवसापासून दिसत आहे. शरद पवारांनी मराठवाड्यात पाय ठेवल्यापासून ते त्यांच्यासोबत सावलीसारखी सोबत करत आहेत. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा मराठवाड्यातील मोजक्या नेत्यांपैकी एक राजेश टोपे यांचे वडील अंकुशराव टोपे होते. तेव्हा पासून टोपे कुटुंबाने शरद पवारांची साथ दिली आहे.

लातूरने सोडली शरद पवारांची साथ 
लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार अजितदादांकडे गेले आहेत. संजय बनसोडे (Sanjay Bansod) यांना धाकल्या पवारांनी पहिल्या मंत्रिमंडळातच स्थान दिले आहेत तर अहमदपूरचे बाबासाहेब पाटील यांनीही अजितदादांनाच राष्ट्रवादीचे कर्ताधर्ता मानले आहे. लातूरमधील राष्ट्रावीद काँग्रेस संघटनेत मात्र मोठी फुटाफूट आहे. प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी शरद पवारांसोबत आहे.

हेही वाचा : अजित पवार यांना शरद पवारांचा स्पष्ट इशारा, म्हणाले – “कोर्टात खेचेन…”

हिंगोली जिल्हा थोरल्या पवारांसोबत
हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकमताने शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, वसमतचे आमदार राजू नवघरे हे सर्व शरद पवारांसोबत आहेत.
परभणी जिल्ह्यातील राज्यसभेच्या खासदार फौजिया खान (MP Fauzia Khan) विधान परिषदेचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष बाबाजीनी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह पदाधिकारी हे शरद पवारांसोबत आहेत. तर अजित पवारांनी ५ जुलैलाल घेतलेल्या बैठकीला परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आमदार मधुसूदन केंद्र उपस्थित होते.

नव्यांना संधी देण्याची गरज 
शरद पवारांना मराठावाड्यातील जुन्याजाणत्या नेत्यांनी साथ दिलेली आहे. त्यासोबतच आता त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना अधिक संधी आणि सक्षम करावे लागणार आहे. काही मोठी नावं सोबत असली तरी नवीन कार्यकर्ते जोडावे लागणार आहेत. मराठवाड्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस शरद पवारांना कायम साथ देत आला आहे. मात्र त्याच्यापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता तयार करण्याचे आता शरद पवारांसमोर आव्हान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -