घरमहाराष्ट्रCNG वरील व्हॅट कमी केल्यानंतर त्यावर कर लावणाऱ्या केंद्राला भाजप नेते जाब...

CNG वरील व्हॅट कमी केल्यानंतर त्यावर कर लावणाऱ्या केंद्राला भाजप नेते जाब विचारणार का?; राष्ट्रवादीचा सवाल

Subscribe

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीएनजीवरील व्हॅट १३.५ टक्क्यांवरुन कमी करुन तीन टक्क्यांवर आणला होता. १ एप्रिलपासून ही कपात लागू झाली. मात्र, केंद्र सरकारने आजपासून ११० टक्क्यांनी नैसर्गिक वायुचे दर वाढविले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातली भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. सीएनजीवरील व्हॅट राज्याने कमी करुन देखील त्यावर पुन्हा कर लादून सीएनजी-पीएनजी महाग करणाऱ्या केंद्र सरकारला राज्यातील भाजप नेते जाब विचारणार का? असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.

अजित पवार यांनी १०.५ टक्क्यांची घसघशीत कपात जनतेचे हित लक्षात घेऊन केली होती. १ एप्रिलपासून ही कपात लागू झाली होती. मात्र केंद्र सरकारला महाराष्ट्रातील जनतेला सीएनजी स्वस्तात उपलब्ध व्हावा हे बहुधा रुचलेले दिसत नाही, असं राष्ट्रवादी म्हटले. आजपासून केंद्र सरकारने ११० टक्क्यांनी नैसर्गिक वायुचे दर वाढविले आहेत. मुंबईत आज सीएनजी ७ रुपये तर पीएनजीमध्ये ५ रुपयांची दरवाढ लागू करण्यात आली आहे.
मुंबईत सीएनजीमध्ये ७ रुपयांची वाढ केल्यामुळे आता ६० रुपयांना मिळणारा सीएनजी प्रतिकिलो ६७ रुपये झाला आहे. तर पीएनजीमध्ये ५ रुपयांची वाढ झाल्यामुळे ३६ रुपयांचा पीएनजी आता प्रतिकिलो ४१ रुपयांवर गेला आहे.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेलचे दर कमी व्हावेत म्हणून राज्यातील भाजपचे नेते हे सातत्याने महाविकास आघाडीला व्हॅट कमी करण्यास सांगत आहेत. संपूर्ण देश इंधन दरवाढीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत असताना राज्यातील भाजप नेते राज्य सरकारकडेच शहाजोगपणे जबाबदारी ढकलत होते. आता सीएनजीवरील व्हॅट राज्याने कमी करुन देखील त्यावर पुन्हा कर लादून सीएनजी-पीएनजी महाग करणाऱ्या केंद्र सरकारला राज्यातील भाजप नेते जाब विचारणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -