घरमहाराष्ट्रमराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण नको; ओबीसी नेत्यांचा मराठा महासंघाच्या मागणीला विरोध

मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण नको; ओबीसी नेत्यांचा मराठा महासंघाच्या मागणीला विरोध

Subscribe

ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण देण्याचा पर्याय

मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी केलेल्या या मागणीचा ओबीसी संघटना आणि नेत्यांकडून सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निषेध नोंदवण्यात आला. तसेच मराठा विरोधात ओबीसी वाद निर्माण न करता मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांतर्गत (ईडब्ल्यूएस) आरक्षण देण्याचा पर्याय सुचवण्यात आला.

पत्रकार परिषदेत ओबीसी समाजाचे नेते हेमंत पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाला स्वतंत्र आरक्षणासाठी पाठिंबा दिला होता. मात्र आता मराठा समाजातील काही नेते ओबीसी आरक्षणातून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहेत. तसे झाल्यास ओबीसी समाजावर हा घोर अन्याय ठरेल. त्यामुळे राज्यात मराठा विरोधात ओबीसी असा संघर्षही निर्माण होऊ शकतो. ज्यामध्ये दोन्ही समाजाचे नुकसान होईल. याउलट मराठा समाजाने आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी ईडब्ल्यूएसचा पर्याय चाचपण्याची गरज असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, राज्य शासनाने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसअंतर्गत १२ टक्के आरक्षण मिळवून देणारा नवा कायदा पारित करण्याचे आवाहन हेमंत पाटील यांनी केले आहे. राज्यात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, याचीही खबरदारी शासनाने घ्यावी. तसेच दोन समाजातील संघर्ष टाळण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घ्यावा, असे साकडे लवकरच उदयनराजेंना भेटून घालणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -