घरमहाराष्ट्रपरमबीर सिंह यांच्याकडे मोठी बेहिशोबी मालमत्ता!

परमबीर सिंह यांच्याकडे मोठी बेहिशोबी मालमत्ता!

Subscribe

पोलीस अधिकार्‍याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकणारे मुंबई पोलीस विभागाचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्यांच्याच खात्यातून एकावर एक लेटरबॉम्ब टाकण्यात येत आहेत. दुसर्‍या लेटरबॉम्बमुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मुंबई पोलीस दलाचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारीनंतर अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

परमबीर सिंह यांच्या विरुद्ध १४ पानांचे पत्र (तक्रार अर्ज) मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना प्राप्त झाले आहे. हा अर्ज अकोला पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी पाठवला आहे. या अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांच्या संपत्तीची तसेच त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलीस महासंचालक यांना पाठवलेल्या १४ पानांच्या या तक्रार अर्जात परमबीर सिंह यांच्या भ्रष्टाचाराची तसेच त्यांच्या बेनामी संपत्तीची माहिती नमूद केली आहे. परमबीर सिंह हे २०१५ ते २०१८ या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्त असताना आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप घाडगे यांनी पत्रात केला आहे.

- Advertisement -

पोलीस दलातील बदल्यासाठी सिंह यांनी एजंट नेमले असून ठाण्यात असताना परमबीर सिंह यांनी रिव्हॉलवर परवानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये बेकायदेशीर कमावले असल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे. गंभीर गुन्ह्यात समरी करण्यासाठी मोठ्या रकमा उकळल्याचा आरोप देखील घाडगे यांनी केला असून अनेक बांधकाम व्यावसायिकांकडे परमबीर यांनी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे घाडगे यांनी पत्रात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी घाडगे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या या तक्रार अर्जामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -