घरताज्या घडामोडीदेवदर्शनाने नागरिकांची नववर्षाला सुरुवात; सिद्धीविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिराबाहेर अलोट गर्दी

देवदर्शनाने नागरिकांची नववर्षाला सुरुवात; सिद्धीविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिराबाहेर अलोट गर्दी

Subscribe

दरवर्षी नववर्षाचे स्वागत देवदर्शनाने करण्याकडे अनेकांचा कल असतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी देवदर्शन घेणे शक्य झाले नाही. दोन वर्षांपासून बंद असलेली मंदिरे यंदा सुरू झाल्याने नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबई, ठाणे, रायगडमधील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांवर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये मुंबईतील सिद्धीविनायक, महालक्ष्मी, वडाळ्यातील प्रति पंढरपूर, मुंबादेवी या मंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रात्रीचे निर्बंध लावल्याने 31 डिसेंबरच्या रात्री रस्त्यांवर फारच कमी गर्दी पाहायला मिळाली. परंतु 2022 च्या पहिल्या दिवशी मुंबईतील विविध मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरामध्ये ऑनलाईन बुकिंग करून प्रवेश दिला जातो. मात्र, ती बुकिंगही पूर्णपणे फुल्ल झाली होती. तसेच अनेक भाविक हे थेट दर्शन घेण्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे नुकताच संपलेला मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आणि नववर्षाचा पहिला दिवस असे औचित्य साधून महालक्ष्मी मंदिर व मुंबादेवी मंदिर, माटुंगा येथील शितलादेवी मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांबा रांगा लागल्या होत्या. महालक्ष्मी मंदिराबाहेरील रांग ही मुख्य रस्त्यापर्यंत आलेली पाहायला मिळाली. तर मुंबादेवी व शितलादेवी मंदिरातही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाविकांची ही गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासन व पोलिसांकडून योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

- Advertisement -

मुंबईतील प्रसिद्ध धार्मिक स्थळांबरोबरच मुंबईबाहेरील रायगड व ठाण्यातील धार्मिक स्थळांवरही स्थानिकांबरोबरच मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक आणि वज्रेश्वरीला भाविकांनी गर्दी केली होती.

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा

- Advertisement -

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. यावेळी मास्क न लावणार्‍या भाविकांकडून पाली नगरपंचायतीकडून दंड वसूल करण्यात येत होता. भाविकांची गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांचा धंदा देखिल तेजीत झाला. पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतूक कोंडी झाली होती. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था केल्याची माहिती बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांनी दिली.

70 हजार भाविकांनी घेतले वरदविनायकाचे दर्शन

महडच्या वरदविनायकाच्या दर्शनासाठी तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ लागत होता. दर्शनासाठी 500 मीटरपेक्षा जास्त लांब रांगा भाविकांनी लावल्याने त्यांना दर्शनासाठी ताटकळत उभे राहावे लागले. दिवसभरात 70 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी वरदविनायकाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे हायवेवरून दर्शनासाठी दीड किमीपर्यंत वाहनांच्या रागा लागल्या होत्या.

वज्रेश्वरीला गरम पाण्याच्या कुंडात आंघोळीला प्राधान्य

सरत्या वर्षाला निरोप देऊन पहाटे गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ करून वज्रेश्वरी येथील देवी आणि गणेशपुरी येथे भगवान नित्यानंद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मुंबई, ठाणे, वसईतील भाविक मोठ्या प्रमाणात आले होते. अकलोली येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळच्या आरतीवेळी दर्शनाची रांग मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत आल्या होत्या. मोठ्या संख्येने भाविक आल्याने मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -