घरमहाराष्ट्रगणपतीत कोकणात जाणार्‍यांची सत्वपरीक्षा!

गणपतीत कोकणात जाणार्‍यांची सत्वपरीक्षा!

Subscribe

या वर्षीचा गणेशोत्सव सुरू व्हायला अवघे १० दिवस उरले असल्याने चाकरमानी गावाकडे निघण्यास हळूहळू सुरूवात झाली आहे. मात्र यंदा ज्या मार्गावरून यापैकी बहुतांश चाकरमान्यांचा प्रवास होणार आहे, त्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला खड्ड्यांनी ग्रासले आहे. तसेच पाऊस पुन्हा दमदार हजेरी लावत आहे. त्यामुळे या खड्ड्यांच्या सत्वपरीक्षेतून सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी कोकणवासियांना थेट गणपती बाप्पालाच साकडे घालण्याची वेळ येणार आहे.

तळकोकणालाच नव्हे तर थेट केरळला जोडणार्‍या या मार्गाला अजूनही पाहिजे तसे महत्त्व दिले जात नाही. चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन एक तप पूर्ण होत आले तरी कामात प्रगती दिसत नाही. झालेल्या कामाचा दर्जा यथातथाच आहे. पावसामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने तेथून प्रवास नकोसा झाला आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमान्यांना घेऊन जाणार्‍या वाहनांची संख्या नेहमीच्या तुलनेत पाच ते सहा पटीने वाढत असते. नेहमीप्रमाणे अवजड वाहतूक सक्तीने बंद करून चाकरमान्यांच्या वाहनांना रस्ता मोकळा करून दिला जातो. तरी रस्त्याच्या सुमार दर्जामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो.

- Advertisement -

पळस्पे ते इंदापूर या चौपदरीकरण सुरू असलेल्या 84 किलोमीटरच्या टापूत जिते ते पेण, पेण ते नागोठणे, पुढे इंदापूरच नव्हे तर थेट पोलादपूरच्या कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाल्यामुळे दीड तासाचा प्रवास पाच तासांपर्यंत जाऊन पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने केलेल्या आंदोलनामुळे पेण ते वडखळ दरम्यान रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू झाले असले तरी पावसामुळे त्यात वारंवार अडथळे येत आहेत. आता होणारे काम काही दिवसांसाठी तरी टिकेल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या पेव्हर ब्लॉकवरून अवजड वाहने जात असल्याने हा रोगापेक्षा उपाय भयंकर ठरण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.

कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्यात येत असली तरी रस्ता मार्गे या कालावधीत एसटी व खासगी बसेस, छोट्या वाहनांची संख्या लक्षणीय असते. या मार्गाला खोपोली-वाकण मार्गाचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र त्याचीही अनेक ठिकाणी दैना झाली आहे. पावसाने पुन्हा एकदा जोरदार बरसायला सुरूवात केल्याने रस्ता दुरुस्ती करताना ठेकेदाराची दमछाक होत आहे. अलिकडे सिंधुदुर्गात जाण्यासाठी पुणे-कोल्हापूर मार्गाला पसंती दिली जात असली तरी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कमी झालेली नाही. परिणामी यंदाचा प्रवास चाकरमान्यांची सत्वपरीक्षा पाहणारा ठरेल, असे सध्याचे चित्र आहे.

- Advertisement -

रस्त्याच्या अवस्थेवरून दावे प्रतिदावे –
* गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करू, असा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या स्थानिक अधिकार्‍यांचा दावा आहे.
* या महामार्गावर वाहतूक वाढणार असली की अवजड वाहतुकीवर वारंवार येणार्‍या सक्तीच्या बंदीबद्दल वाहतूकदारांत तीव्र नाराजी आहे. होणार्‍या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा त्यांचा सवाल आहे.
* खड्ड्यांमुळे किंवा खराब रस्त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असल्याने चांगला रस्ता सुरू होताच छोट्या वाहनचालकांत पुढे जाण्याची लागणारी स्पर्धा अनेकदा अपघाताला निमंत्रण देते.
* शहरातून येणार्‍या छोट्या वाहनांपैकी अनेक वाहने अननुभवी चालक चालवत असतात. वळणावळणाच्या रस्त्याचा कोणताही अंदाज त्यांना नसतो. ते पुढे जाण्याची घाई करत असतात. त्यातून हमरातुमरीचे प्रसंग घडतात.

गणपतीत कोकणात जाणार्‍यांची सत्वपरीक्षा!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -