घरमहाराष्ट्रमुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी ट्रिपल इंजिनचे सरकार हवे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी ट्रिपल इंजिनचे सरकार हवे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईकरांना साद, महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला

मुंबई हे देशाचे हृदय आहे. मुंबईच्या विकासात महापालिकेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत विकासाला समर्पित असणारे लोक असतील तर मुंबईचा विकास अधिक गतीने होईल. मुंबईच्या विकासासाठी महापालिकेसह ट्रिपल इंजिन सरकार लागणार आहे, अशी साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईकरांना घातली. राज्यातील शिंदे-फडणवीस ही जोडी मुंबई आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासोबतच आपले स्वप्न साकार करेल, असा विश्वास व्यक्त करीत मोदींनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

मुंबईतील २ मेट्रो मार्गांचे लोकार्पण यासह ३८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या सभेत आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करीत मोदींनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मोदी यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर नाव न घेता टीका केली. मुंबई महापालिकेकडे निधीची कमतरता नाही, मात्र मुंबईकरांच्या हक्काचा पैसा योग्य पद्धतीने वापरला पाहिजे. हा पैसा भ्रष्टाचार, बँकेची तिजोरी भरण्यासाठी वापरला गेला. विकासात अडथळा आणण्याची प्रवृत्ती असेल तर मुंबईच्या विकासाचे भवितव्य उज्ज्वल कसे राहील, असा सवाल करीत मोदी यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

२०१४ पूर्वी मुंबईत मेट्रोचे फक्त १०-११ किमीचे जाळे होते. नंतर त्याने वेग घेतला. दरम्यानच्या काही कालावधीत त्याचा वेग मंदावला होता, मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या सर्व विकासकामांनी वेग घेतला आहे. रेल्वे स्थानकांचाही विमानतळांसारखाच विकास होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही कायापालट करण्यात येणार आहे. लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी मोठ्या सुविधा देण्यात येणार आहेत. मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी करण्यात येणार आहे. प्रवासाची सर्व साधने एकाच छताखाली आणण्यात येणार आहेत.

देशातील प्रत्येक शहरात हे आपण करणार आहोत. मुंबईकरांचे जीवन सुखकर करण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येतील. कोस्टल रोड, इंदू मिल, शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक, धारावी पुनर्विकास तसेच जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येईल. मुंबईतील रस्ते नव्याने बनविण्यात येणार आहेत. असे प्रकल्प यशस्वीरित्या राबवायचे असतील तर स्थानिक महापालिकेची भूमिका महत्त्वाची ठरते, असे मोदी म्हणाले. धारावी झोपडपट्टी आणि जुन्या चाळींच्या पुनर्विकासाला गती दिल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी शिंदे, फडणवीस यांचे अभिनंदन केले.

- Advertisement -

सामान्य लोकांनी त्रास सहन करायचा, शहरांनी विकासापासून वंचित राहायचे ही स्थिती एकविसाव्या शतकातील भारतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अजिबात स्वीकारली जाणारी नाही, असेही मोदी यांनी सुनावले. भाजप आणि एनडीएच्या राजवटीत विकासाचे राजकारण केले जात नाही. विकास हाच आमचा प्राधान्यक्रम आहे. राजकीय स्वार्थासाठी भाजप कधीही विकासाच्या आड येत नाही, असेही मोदी म्हणाले.

या कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान स्वनिधी योजनेतील लाभार्थी असलेल्या जवळपास एक लाख फेरीवाल्यांच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा करण्यात आली. यावेळी फेरीवाल्यांना उद्देशून मोदी यांनी तुम्ही १० पावले चालला तर मी तुमच्यासाठी ११ पावले चालणार असल्याचा शब्द देत स्वनिधी योजनेचे महत्त्व पटवून दिले. फेरीवाले हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून त्यांना विनातारण कर्ज मिळणार आहे. कोरोना काळात ही योजना आणली होती, मात्र तेव्हाच्या सरकारने या योजनेत अडथळा आणला. राज्यात डबल इंजिनचे सरकार आल्यानंतर या योजनेला गती आली. स्वनिधी ही केवळ कर्ज देण्याची योजना नाही, तर फेरीवाल्यांचे आर्थिक सामर्थ्य वाढविणारी योजना असल्याचे मोदी यांनी सांगितले.

ऋषी सुनक यांच्याकडून बचाव
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बनवलेला ‘द मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट बुधवारी यू ट्यूबवरून हटवण्यात आला आहे, मात्र त्यावरून वाद सुरूच आहे. या माहितीपटाचा वाद ब्रिटिश संसदेत पोहचला आहे. ब्रिटनचे पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसेन यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नरेंद्र मोदी यांचा बचाव करताना या माहितीपटात पंतप्रधान मोदी यांचे जे चरित्र चित्रण केले आहे, त्याच्याशी आपण सहमत नाही, असे म्हटले आहे.

आपले सरकार देशातील ८० कोटी लोकांना रेशनवर मोफत धान्य देते, असे पंतप्रधान मोदी स्वतःच सांगतात. देशातील गरिबी कमी झाल्याचे मोदींना म्हणायचे असेल तर हे ८० कोटी गरीब आले कुठून? मोदींनी नेहमीप्रमाणे प्रचार मंत्रीपदाला साजेसे प्रचारी भाषण केले. मुंबईकरांचे जीवन सुखकर करण्याचे बोलत असताना त्यांच्या आजच्या कार्यक्रमामुळे मुंबईकरांचे किती हाल झाले याचाही त्यांना व भाजपला विसर पडला.
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

काही लोकांची अपेक्षा होती की हे कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या हस्ते होऊ नयेत, पण तसे झाले नाही. महाराष्ट्र आणि मुंबईकरांची जी इच्छा होती तेच झाले. आमचे सरकार पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनानुसारच प्रगतीशील काम करीत असल्याने अनेकांच्या पोटात मळमळ होत आहे. ६ महिन्यांमध्ये या सरकारने एवढे काम केले तर पुढच्या २ वर्षांत काय करतील या अस्वस्थतेतूनच ही टीका होत आहे.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई महापालिकेवर ज्यांनी २० ते २५ वर्षे राज्य केले, त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केले आणि स्वतःची घरे भरली, पण मुंबईकरांना शुद्ध पाणी देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आमचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामांना गती दिली आणि गतीने ही कामे पूर्ण केली जात आहेत. त्याच प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहेत.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -