घरदेश-विदेशठाणेकर अर्जुन देशपांडेच्या जेनेरिक आधारमध्ये रतन टाटा सहभागी होणार

ठाणेकर अर्जुन देशपांडेच्या जेनेरिक आधारमध्ये रतन टाटा सहभागी होणार

Subscribe

गरीब भारतीयांना स्वस्त दरात औषधे मिळणार

शहरातील अठरा वर्षांचा मुलगा गेली दोन वर्षे जेनेरिक औषधे स्वस्त दरात लोकांना उपलब्ध करून देत आहे, हे समजल्यावर त्याच्या या उपक्रमात सक्रीय भागीदार म्हणून सहभागी होण्याचा निर्णय भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी घेतला आहे. अर्जुन देशपांडे या ठाणेकर युवकाचा हा फार मोठा गौरव आहे. तसेच भारतीयांना स्वस्त दरात औषधे देण्याचे रतन टाटा यांचे स्वप्न यामुळे प्रत्यक्षात साकार होणार आहे.

अर्जुन देशपांडे याने वयाच्या १६ व्या वर्षी ‘जेनेरिक आधार’ या संस्थेची स्थापना केली. तो जेनेरिक आधारचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झाला. भारतीय सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी ठराविक भारतीय फार्मा बिझिनेस साखळीत नाविन्यपूर्ण क्रांती घडवित त्याने भारतातील प्रत्येक शहरात परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट ठेवले आणि तसे काम सुरू केले. एकेका मेडिकल स्टोअरला पाठिंबा देत जेनेरिक आधार औषधे पुरविणारी ही पहिली कंपनी ठरली. अर्जुन देशपांडे याच्या जेनेरिक आधार या कंपनीला बरीच स्पर्धा होती. मोठमोठ्या वैद्यकीय मॉल्स आणि ऑनलाइन फार्मसींना त्याचा धक्का बसला. अर्जुन देशपांडे जेनेरिक आधारच्या माध्यमातून एकेक मेडिकल स्टोअरला ऑफलाइन + ऑनलाइन मदत करत होता. बी 2 बी 2 सी व्यवसाय मॉडेलमुळे मेडिकल स्टोअर्सना व्यवसाय वाढीसाठी जेनेरिक आधारचा मोठा आधार मिळाला.

- Advertisement -

अवघ्या अठराव्या वर्षात ठाणेकर अर्जुन देशपांडे याने परवडणारी औषधे देऊन फार्मा उद्योगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अजूनही आपले भारतीय लोक अनावश्यक औषधांसाठी मोठी किंमत मोजत आहेत आणि सर्वसामान्यांच्या खांद्यावर त्याचे ओझे पडत आहे. सर्वेक्षणानुसार काही लोक अद्याप ब्रॅन्डेड औषधांच्या चढ्या किमतीमुळे औषधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणून अर्जुनने ठरवले की आपण थेट डब्ल्यूएचओ जीएमपीकडून प्रत्येक भारतीयाला परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण औषधे मिळू शकतील, असा व्यवसाय करुया. त्यात त्याला चांगले यशही आले.

अर्जुन देशपांडे याच्या मिशनमुळे ज्येष्ठ नागरिकांसह, पेन्शनधारकांना सर्वाधिक फायदा होत आहे. दरमहा औषध घेत असलेल्या त्यांच्या मासिक बजेटपैकी बरीच बचत होते. याबरोबरच अर्जुनच्या जेनेरिक आधारतर्फे दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. त्याचा लाभ हजारो लोक घेतात.

- Advertisement -

किशोरवयीन अर्जुन गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लोकांसाठी आरोग्य सेवा क्षेत्रात कठोर परिश्रम घेऊन नवनवीन उपक्रम राबवत आहे. जेनेरिक औषधांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करीत आहे, असे रतन टाटा यांना समजले तेव्हा ते खूप प्रभावित झाले.

या चांगल्या व्यवसायासाठी जेव्हा अर्जुनने त्याच्या जेनेरिक आधारच्या व्यवसायाची माहिती दिली तेव्हा टाटा यांनी अर्जुनच्या मोहिमेचा भाग होण्याचे ठरवले. जेनेरिक आधारच्या औषधांचा भारतीयांसाठी उपयोग करायचे ठरविले. त्यामुळे रतन टाटा यांचे भारतीय लोकांसाठी परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

रतन टाटा यांच्या सहकार्याने लवकरच भारताच्या प्रत्येक शहरात अर्जुन देशपांडे यांचे जेनेरिक आधार सुरू होणार आहे. त्यासाठी स्वतः रतन टाटा उपस्थित राहणार आहेत. अर्जुन देशपांडे याला लहान वयात मिळालेला हा बहुमान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -