घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकरांचे मरणोत्तर देहदान

स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकरांचे मरणोत्तर देहदान

Subscribe

देशाच्या स्वातंत्र्यलढयात सक्रिय सहभाग असणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वसंत हुदलीकर (वय 9८) यांचे बुधवारी (दि. ५) पहाटे ५.३० वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा आडगाव येथील डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाकडे त्यांचे पार्थिव सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हुतात्मा स्मारक पोरके झाले. तसेच, डाव्या विचारसरणीच्या चळवळीतही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, तहसीलदार अनिल दौंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्यांचे पार्थिव हुतात्मा स्मारक येथे आणण्यात आले. या ठिकाणी स्मारकातील विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

स्वातंत्र्योत्तर काळात मोफत शिक्षणाचे स्वप्न पाहिले होते

भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारत कसा असेन याचे स्वप्न पाहिले होते. भारत सुजलाम, सुफलाम असेल. संविधानाप्रमाणे कामगार, शेतकर्‍यांचे राज्य येईल, खादीचा वापर होईल, प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत शिक्षण मिळेल, हे स्वप्न पाहिले होते. प्रत्यक्षात महागड्या शिक्षणाचे दिवस पाहण्याची वेळ आली. भारत दलालांचा देश झाला असून सामान्य लोक नाईलाजास्तव जगत आहेत. मोजके अधिकारी सोडले, तर प्रशासकीय यंत्रणेत पैसे घेतल्याशिवाय कामे होत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर (वय ९८) यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना नुकतीच व्यक्त केली होती.

- Advertisement -

हुदलीकर म्हणाले, आजही अनेकांना झेंडावंदन कसे करावे माहिती नाही. बेशिस्त वाहनांमुळे रस्त्याने नीट चालता येत नाही. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलीस नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. ब्रिटिश काळात कायद्यांची कडक अंमलबजावणी व्हायची. मात्र, आता कायदे व नियमांची मनमानी पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे. राजकीय लोक खादी कपडे वापरत नाहीत. ते विदेशी कपडे खरेदी करत आहेत. प्रशासकीय कार्यालयात एखादा अर्ज तीन-चार महिने झाले तरी पुढे सरकत नाही. ७४ वर्षांनंतरही स्वातंत्र्यसैनिकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. स्वातंत्र्यसैनिकांना तुटपुंजी पेन्शन दिली जात आहे. महागाईमुळे सर्व पेन्शन औषधोपचार व प्रवास खर्चात जात आहे. सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या मानधनात दुजाभाव केला आहे. गोवा मुक्तीसंग्रामात एक दिवस सहभागी झालेल्यांना ३० हजार रुपये पेन्शन दिली जात आहे, तर गोवा मुक्तीसाठी तुरुंगवास भोगलेल्यांना १० हजार रुपये पेन्शन दिली जात आहे. सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांना १० एकर जमीन व घरे दिली. मात्र, नाशिकमधील एकाही स्वातंत्र्यसैनिकाला जमीन आणि घरसुद्धा मिळाले नाही. अर्जाला एस.एम.जोशींचे पत्र जोडूनसुद्धा प्रशासन व सरकारने दाद दिली नाही. स्वातंत्र्यलढ्यात आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे सरकारी कार्यालयात फोटो दिसत नाहीत, याची खंत वाटते.

स्वातंत्र्याचा नीट उपयोग करा

प्रत्येक भारतीय व्यक्तीने बलीदानाचे स्मरण ठेवून स्वातंत्र्याचा नीट उपयोग करावा. सर्व भारतीय एक आहोत. धर्म, जात, भाषा व प्रांतावरून एकमेकांचा द्वेष करू नये. प्रत्येकाने लोकशाहीचे पालन केले पाहिजे. भारत सुजलाम, सुफलाम होण्यासाठी अंगमेहनत करावी. वाईट मार्गाला जाऊ नये. देशातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना बालवाडी ते उच्च शिक्षण मोफत मिळाल्यावरच देशाला खरे स्वातंत्र्य मिळाल्याचा अभिमान वाटेल, असेही वसंत हुदलीकर यांनी सांगितले.

- Advertisement -

स्वातंत्र्य लढ्यातील चालता-बोलता इतिहास

वसंत हुदलीकर स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्रोत्तर काळात राष्ट्र सेवा दलात कार्यरत होते. त्यांचा जन्म १५ मार्च १९२५ रोजी झाला. त्यांची आई राधाबाई हुदळीकर स्वत: लढ्यात सहभागी व्हायची. वडील बाळकृष्ण हुदळीकर कलेक्टर ऑफिसमध्ये हेडक्लार्क होते. चौघे भावंडे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्याने अधिकारी वडिलांना विचारणा करायचे. त्यावेळी वडील सांगायचे, मुले मोठी झाली आहेत. ते माझे ऐकत नाहीत. ते स्वातंत्र्यसैनिक संघटना, हुतात्मा स्मारक, खादी ग्रामोदयोग, समर्थ सहकारी बँक, देशस्थ ऋग्वेदी संस्था आदी संस्थांशी तसेच विविध सामाजिक कार्यात त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. १९४२ साली झालेल्या स्वातंत्र्य लढयात त्यांचा सहभाग होता.

हुदलीकर यांना साने गुरुजींविषयी बालपणापासून आदर होता. शाळेत साने गुरुजी यावेत, यासाठी त्यांनी पेठे शाळेतील शिंदे गुरुजींकडे हट्ट धरला. १९४१ साली साने गुरुजी शाळेत आले. त्यावेळी व्हर्न्याकल फायनल म्हणजे आठवीच्या वर्गात होते. ७ ऑगस्ट १९४२ पासून महात्मा गांधी चले जाव चळवळ सुरु करणार आहे. या लढ्यात सहभागी व्हावे, असे गुरुजींनी आवाहन केले. तेंव्हापासून ते साने गुरुजींसमवेत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. ७ ते ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदान येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात ते सहभागी झाले. व्यासपीठावर स्वच्छता व पाण्याची व्यवस्था ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांना महात्मा गांधीजींना जवळून पाहता आले. ७ ऑगस्ट रोजी गांधीजींनी ब्रिटीश सत्तेला हाकलून लावण्यासाठी ‘चले जाव’ची गर्जना करत करेंगे या मरेंगे हा मंत्र दिला. ८ ऑगस्ट रोजी चळवळीतील नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक झाली. अनेकांना येरवडा, अहमदनगर, नागपूर तुरुंगात पाठविले. मात्र, नाशिकमधील सर्व कार्यकर्ते इंग्रजांच्या हाताला लागले नाहीत. त्यानंतर सर्वजण भूमीगत झाले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी सकाळी गवालिया टँक मैदानावर अरुणा असफ अली यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यावेळी ते त्या ठिकाणी होते.

इंग्रजांनी नेत्यांना अटक झाल्याने जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन, एम. एम. जोशी, साने गुरुजी यांनी भूमिगत राहून चळवळीचे नेतृत्व केले. या सर्वांनी महाराष्ट्रात लढा सुरु ठेवला. नाशिकमध्ये वसंत नारायण नाईक, प्रकाश मोहाडीकर, शाम हरी देशपांडे, वसंत उपाध्ये, बाळू खरे यांच्या नेतृत्वाखाली लढा चालू झाला. सरकारी यंत्रणा खिळखिळी करण्याचे काम हुदलीकर यांनी स्वीकारले. त्यानंतर सर्वांनी सरकारी कागदपत्रे, ब्रिटिशांचे डेपो, कार्यालये जाळली, टेलिफोनच्या तारा व खांब तोडले. शेवटपर्यंत इंग्रजांना कोणी तारा तोडल्या, याचा सुगावा लागाला नव्हता.
ठाण्याचे मारुती कोळी हे नाशिकमधील कार्यकर्त्यांच्या भेटीस आले. त्यांनी सर्वांना नेमबाजी व बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रात्यक्षिकांसाठी इंग्रजांच्या दूध नेण्यासाठी भैय्या पांडे यांच्या दुकानाजवळ येणार्‍या गाडया बॉम्बने जाळल्या. प्रकाश मोहाडीकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात चले जाव मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी इंग्रजांच्या हाती सर्वजण सापडले. हुदलीकर हे किशोरवयीन असल्याने इंग्रजांनी दम देवून त्यांना सोडले.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी पहिल्या स्वातंत्र्यदिनी त्र्यंबकेश्वर रोडवरील वासाळी गावी वसंत हुदलीकर यांनी झेंडावंदन केले. महात्मा गांधींनी खादी वापरण्यास सांगितल्याने १९४१ पासून शेवटपर्यंत त्यांनी खादीची कपडे वापरले. त्यांनी महाराष्ट्र राष्ट्रभाषेचे ३ परीक्षा दिल्या असून, हिंदी भाषा व खादीचा प्रचार केला. ते हुतात्मा स्मारकाचे सर्वेसर्वा होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटावा, यासाठी ते विशेष आग्रही होते. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी नाशिक शहरात यायचे, तेंव्हा आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हुतात्मा स्मारकाची दरवाजे कायम खुले ठेवली.

चळवळींचे ऊर्जावान साथी हुदलीकर बाबा…

वसंत हुदलीकर यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्थान, सन्मानच नव्हे तर हुतात्मा स्मारकही अखेरपर्यंत सांभाळले. ते प्रगल्भ व पुरोगामी विचारांचे, धर्मांध शक्तींच्या विरोधात भूमिका घेणारे होते. त्यांच्यामध्ये सत्याग्रही मार्गानेच नवा भारत घडविण्याचा दुर्दम्य आशावाद होता. नाशकातल्या आजच्या लढ्यांशी स्वातंत्र्यलढ्यास जोडणारा हा दुवाच निखळला. नेहमी भेटल्यावर आठवणीने फूल देणारे ते यावेळी साडी भेट देऊन गेले, ते कायमचेच.

– मेधा पाटकर, सामाजिक कार्यकत्या

मद्यपी वडिलांनी काढले घराबाहेर, पण बाबांमुळे झालो प्राध्यापक

पेठ तालुक्यातील आमलोन गावात शिक्षणाची सुविधा नसल्याने आणि मद्यपी वडिलांनी घराबाहेर काढले. भावी आयुष्य चांगले घडावे, यासाठी शिक्षणाच्या निमित्ताने नाशिक शहरात आलो खरा पण रहायचे कुठे, जेवायचे कुठे आणि शिक्षण कसे पूर्ण करायचे, असे अनेक प्रश्न होते. स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर ऊर्फ बाबा भेटल्याने हुतात्मा स्मारकात अभ्यास, निवारा आणि जेवणाची सोय झाल्याने जी पॅट परीक्षेत देशांत नववा येऊन एम. फार्मसी पूर्ण करता आले. आज बाबांमुळे इगतपुरीतील एसएमबीटी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहे, असे अशोक राबडे (वय ३१) यांनी सांगितले.

स्मारकात २०१५ ते २०२० या कालावधीत राहून एम. फार्मसी शिक्षण पूर्ण केले. या कालावधीत बाबाच गुरु, आई व वडील होते. त्यावेळी स्मारकात मुले असायची. काहीवेळा धान्य संपायचे. ते बाबांना सांगितले असता ते लगेच शहरातील दुकानदारांना कॉल करुन सांगून ठेवायचे. त्यानुसार दुकानदारांकडून धान्य घेऊन यायचो. बाबा कडक शिस्तीचे होते. ते स्मारकात आले की विचारपूस करायचे. त्यांनी प्रामाणिकपणा, कष्टासह वाचन करायले शिकवले. वेळप्रसंगी ते शाबासकीची थाप द्यायचे. अभ्यास करताना पुस्तकांची गरज पडायची पण खिशात पैसे नसयाचे. हे बाबांना समजले की, ते पुस्तके विक्रेत्यास कॉल करुन सांगून ठेवायचे. त्यानुसार पुस्तक घेऊन यायचो. नंतर बाबा त्यास पैसे द्यायचे. त्यातून एम. फार्मसी पूर्ण झाल्यानंतर एसएमबीटी महाविद्यालयात नोकरी मिळाली. हे बाबांना सांगितले, तेंव्हा त्यांना खूप आनंद झाला, असे राबडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -