घरमहाराष्ट्रप्रधान सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

प्रधान सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

Subscribe

वाधवान प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव करणार चौकशी

डीएचएफएलचे प्रवर्तक आणि येस बँक घोटाळयातील आरोपी कपिल वाधवान यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना महाबळेश्वरसाठी व्हीआयपी प्रवास पास देण्याच्या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ निर्माण झाला आहे.हे पत्र देणार्‍या गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. राज्यात लॉकडाऊन असतानाही वाधवान कुटुंबियांसह मित्रपरिवारातील २३ जणांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी व्हीआयपी पास देण्यात आला.गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या लेटरहेडवर हे पत्र दिल्याने एकच खळबळ उडाली.दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ कारवाई करत प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी होईपर्यंत गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. गृह मंत्रालय तसेच सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे देशमुख यांनी जाहीर केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री मौन सोडा -देवेंद्र फडणवीस
संचारबंदीच्या काळातही आरोपी वाधवान यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ८ एप्रिल रोजी महाबळेश्वरला जाण्यासाठी विशेष पास देण्याच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी पत्र देणारे गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाईची मागणी करताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री गप्प का,असा सवाल करत त्यांनी मौन सोडण्याची मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.राज्यात श्रीमंतांना लॉकडाउन नाही काय? पोलिसांची अधिकृत परवानगी घेऊनच काही जण महाबळेश्वरला सुट्टीसाठी गेले. इतक्या मोठ्या चुकीचे परिणाम काय होतील याची माहिती असताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी असे कृत्य करेल असे वाटत नाही.अर्थातच गुप्ता याला जबाबदार आहेतच.पण हे नेमके कोणाच्या आशीर्वादाने घडले याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज?
महाराष्ट्रात करोनाचा कहर वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमाने आणि परिश्रमपूर्वक राज्यातील परिस्थिती हाताळत आहेत. ठाकरे यांच्या कामाचे सर्वच थरांतून कौतुक होत आहे. सरकार तसेच प्रशासन करोनाचा मुकाबला करण्यात गुंतले असताना हे प्रकरण घडल्याने उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाल्याचे समजते. ठाकरेंनी या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी मध्यरात्री संपर्क साधला.गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवून तातडीने चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याचे समजते.

वाधवान कुटुंबावर गुन्हे दाखल
वाधवान बंधूं पलायन प्रकरणी अमिताभ गुप्ता यांची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांना दिलेत. वाधवान कुटुंबावर आयपीसी, कोव्हीड १९ कायदयांतर्गत विविध गुन्हेही दाखल केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. भाजपा नेते किरिट सोमैया हे उपद्रवी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत.आयपीएस अधिका-याला बडतर्फ करण्याचे अधिकार केंद्र सरकारला असतात.सोमैया आणि भाजपा नेत्यांनी केंद्र सरकारला सांगून गुप्ता यांना बडतर्फ करावे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -