घरमहाराष्ट्रप्रियंका चतुर्वेदींना शिवसेनेत जागा कळेल

प्रियंका चतुर्वेदींना शिवसेनेत जागा कळेल

Subscribe

प्रियंका चतुर्वेदी यांनी वैयक्तीक राजकारणाला पक्षाचे राजकारण बनवले. त्यांनी पक्ष डोळ्यासमोर ठेवून मोठा विचार केला असता तर हा मुद्दा दुसर्‍या पद्धतीने सोडवता आला असता. पण प्रियंका चतुर्वेदी या महत्वाकांक्षी होत्या. थोड्या कालावधीतच त्यांना पक्षात मोठे स्थान मिळाले होते. काँग्रेस पक्षाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर आणले, पण शिवसेनेसारख्या पक्षात त्यांना काय स्थान मिळते हे येत्या दिवसांमध्येच स्पष्ट होईल, अशी टिका ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव अप्सरा रेड्डी यांनी खास दै. आपलं महानगर’शी बोलताना केला.

प्रियंका चतुर्वेदी यांना ज्या लोकांकडून त्रास झाला त्याच स्वरूपाची गुंड प्रवृत्ती असणारी माणसे ही त्यांनी निवडलेल्या शिवसेना या पक्षातही आहेत. मुंबईत त्यांना कोणताही पाठिंबा नाही. अशावेळी मुंबईत प्रियंका चतुर्वेदी यांना कसा तग धरता येईल, यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर काम केले. पण शिवसेनेत मात्र त्यांना मुंबईतून असा कोणताही भक्कम पाठिंबा नाही, असेही रेड्डी म्हणाल्या. आता प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल बोलणे हे निरर्थक आहे. काँग्रेसने त्यांना ब्रॅण्ड केले पण पक्षासाठीची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडावीशी वाटली नाही, अशीही खंत रेड्डी यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी नेहमी ‘दिल से…’ अशा पद्धतीचे राजकारण केले आहे. त्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महिलांच्या विषयांकडे जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे. महिलांचे सक्षमीकरण, महिलांवर होणारे अत्याचार, छोट्या मुलांवर होणारे बलात्कार यासारख्या विषयांवर मोदी गेल्या पाच वर्षात बोलताना कधीच दिसले नाहीत. छोट्या मुलांवर बलात्कार करणार्‍यांना फाशीवर चढवले असे पंतप्रधान सांगतात. पण कोणत्याही आरोपीला अशा पद्धतीची शिक्षा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांचे शिक्षण, त्यांनी आर्थिकदृष्ठ्या सक्षम करणे, महिलांच्या आरोग्याविषयी बोलताना पंतप्रधान कधीच दिसले नाहीत. पंतप्रधान फक्त खोट बोलत राहिले. त्यामुळे पंतप्रधानांनी महिला वर्गाची माफी मागायला हवी, असे रेड्डी म्हणाल्या.

मोदी यांनी शहीद जवानांच्या नावे मते मागितली. शेतकर्‍यांच्या नावे मते मागितली. त्यासाठी ते वारंवार खोटे बोलत राहिले. अक्षय कुमार यांनी घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत ही केवळ निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेला बगल देण्यासाठीची एक उत्तम खेळी होती. पण दोघेही उत्तम कलाकार आहेत, असा चिमटाही रेड्डी यांनी यावेळी काढला. देशातील निवडणुकीला सामोरे जाताना पंतप्रधान देशपातळीचे मुद्दे सोडून आंबा या विषयावर चर्चा करत आहेत. तसेच मानव अधिकार विषयावर देशभरात ३७७ विधेयकाच्या निमित्ताने चर्चा सुरू असताना पंतप्रधान जाणीवपूर्वक गप्प राहिले, असाही आरोप रेड्डी यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -