घरमहाराष्ट्रपुण्यात पावसाचा हाहाःकार; १९ बळी तर ९ जण बेपत्ता

पुण्यात पावसाचा हाहाःकार; १९ बळी तर ९ जण बेपत्ता

Subscribe

बुधवारी रात्री तीन तास झालेल्या अतिवृष्टीने पुण्यात १९ जणांचा बळी गेला तर ९ जण अजूनही बेपत्ता आहे. पावसामुळे सुमारे पाच हजारांहून अधिक कुटुंबे विस्थापित झाली आहेत. तर वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुरामुळे ६१ जनावरे वाहून गेली आहेत. त्यातच आता आणखी काही दिवस याचप्रकारे अतिवृष्टीचा अंदाज वेधशाळेने वर्तविला असल्यामुळे पुणेकरांमध्ये घबराट पसरली आहे.

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेला. सुमारे तीन तासात वेधशाळेने ५१ मिलिमीटर पावसाची नोंद केली आहे तर महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात १०६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कात्रज येथे उगम पावणार्‍या आंबील ओढ्याने रौद्र रूप धारण केले.

- Advertisement -

पाण्याच्या जोरदार लोंढ्यामुळे ओढ्यावर असलेले कलवर्ट आणि संरक्षण भिंत फोडून पाणी आजूबाजूच्या परिसरात घरात, सोसायट्यांमध्ये वेगाने पाणी घुसले. कात्रज, कोल्हेवाडी, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, वारजे, कर्वेनगर, दांडेकर पूल आदी भागातही पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले. पाण्याच्या वेग इतका जोरात होता की त्यात चारचाकी, दुचाकी वाहने वाहून गेली.पाणी तुंबल्याने अडकून पडलेल्या सव्वापाचशे नागरिकांना अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. तर खबरदारीचा उपाय म्हणून साडेतीन हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

ओढ्याच्या पाण्यामुळे सहकारनगर भागातील टांगेवाला कॉलनीत एका गृह प्रकल्पाची संरक्षक भिंत कोसळून सहाजण मरण पावले. सिंहगड रस्ता वानवडी येथे देखील वाहून गेल्याने चारजणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आले. तसेच काही नागरीक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. सहकार नगर येथे गोठ्यातील म्हैस, गाई असे ६१ हून अधिक जनावरे पाण्यात वाहून गेली. जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे तीन बळी गेले आहेत. खेड शिवापूर येथे पाचजण वाहून गेले होते. त्यापैकी तीन मृतदेह पोलिसांना मिळाले आहेत .

- Advertisement -

पाणी आणि वीज पुरवठा खंडित
आंबील ओढ्याच्या पुराचे पाणी पद्मावती पंपिंग स्टेशन मध्ये पाणी शिरल्याने येथील पंप, मोटार नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे दक्षिण पुण्यात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुढील पाच दिवस याभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. हे पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आणखी चार-पाच दिवसांचा अवधी आणि काही कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा हा पुढील आठवडाभर विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

बुधवारी रात्री पडलेला जोरदार पाऊस हा स्थानिक वातावरणातील बदलाचा परिणाम असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी म्हटले आहे. या प्रकारे आणखी चार दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने अत्यावश्यक ती उपाययोजना केली आहे. बाधित पाच प्रभागात अडीचशेहून अधिक कर्मचारी अहोरात्र नियुक्त करण्यात आलेले आहेत. अग्निशामक दल, एनडीआरएफ यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पुणे शहराच्या दक्षिण भागाप्रमाणेच जिल्ह्यातील खेड शिवापूर, नारायणपूर, कापूरहोळ आदी भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे कर्‍हा नदीला पूर आला आहे. या नदीवरील नाझरे हे धरण भरल्याने त्यातून सुमारे प्रतिसेकंद साडेअकरा हजार क्युसेक गतीने पाणी नदीत सोडले जात आहे.याचा परिणाम नदीच्या काठावर असलेल्या गावात पूरस्थिती निर्माण झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -