घरमहाराष्ट्र'शेतकऱ्यांप्रती भाजप सरकारची संवेदना मेली'

‘शेतकऱ्यांप्रती भाजप सरकारची संवेदना मेली’

Subscribe

विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, मागील तीन महिन्यात पंतप्रधान दोन वेळा महाराष्ट्रात आले. पण एकदाही त्यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज भासली नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या भाषणात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काहीही बोलले नाही, त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सरकारच्या लोकविरोधी कारभाराच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून झालेल्या बेदम मारहाणीचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, मागील तीन महिन्यात पंतप्रधान दोन वेळा महाराष्ट्रात आले. पण एकदाही त्यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज भासली नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उद्घाटनांसाठी नरेंद्र मोदींकडे वेळ आहे, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सवड का नाही, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – शेतकऱ्यांवर एंजियोप्लास्टीची वेळ – राधाकृष्ण विखे पाटील

- Advertisement -

काय म्हणाले विखे पाटील?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेटायला वेळ नसेल तर किमान महाराष्ट्रात आल्यानंतर येथील दुष्काळ निवारणासाठी भरीव आर्थिक मदत करण्याची घोषणा तरी त्यांनी करायला हवी होती. मात्र पंतप्रधानांनी साधी घोषणा करण्याचे सौजन्यही दाखवलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस पंतप्रधानांकडे दुष्काळी मदतीसाठी साकडे घातले. त्यापश्चातही नरेंद्र मोदींनी दुष्काळी मदतीबाबत मौन बाळगावे, हे संतापजनक आणि शेतकऱ्यांप्रती भाजप सरकारच्या संवेदना मेल्याचे निदर्शक असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – हे ‘जलयुक्त’ नाही ‘झोलयुक्त’ शिवार- विखे पाटील

- Advertisement -

‘त्या’ पोलिसांना तातडीने निलंबित करा!

भाजप सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर निदर्शने करणाऱ्या युवक काँग्रेस आणि एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानवी पद्धतीने मारहाण करण्याच्या घटनेचाही विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. एक तर लोकहिताचे निर्णय घ्यायचे नाही आणि त्याविरूद्ध कोणालाही बोलूही द्यायचे नाही, असा या सरकारचा हुकूमशाही कारभार सुरू असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. पंतप्रधानांच्या दौऱ्यात निदर्शने केली म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असते तर समजू शकलो असतो. पण त्यांना अमानुष पद्धतीने लाथांनी तुडवण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही करणाऱ्या पोलिसांना तातडीने निलंबित केले नाही तर स्वतः सोलापुरात जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -