घरमहाराष्ट्रकाँग्रेसचा मुद्दा माझ्यासाठी संपला - राधाकृष्ण विखे पाटील

काँग्रेसचा मुद्दा माझ्यासाठी संपला – राधाकृष्ण विखे पाटील

Subscribe

लोकसभा निवडणुकांदरम्यान पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता भाजपप्रवेशाची फक्त औपचारिकताच राहिली असल्याचे सूतोवाच दिले आहेत. संगमनेरमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी ते आले असताना काँग्रेसबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘काँग्रेस पक्षामध्ये माझी घुसमट होत होती. पण आता काँग्रेसचा विषय माझ्यासाठी संपला आहे’, असं राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. तसेच, ‘मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं आणि कोणतं खातं द्यायचं हा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. पण ते जेव्हा सांगतील, तेव्हा मी तयार असेन’, असंही यावेळी विखे पाटील म्हणाले.

काय घडलं लोकसभा निवडणुकीदरम्यान?

लोकसभा निवडणुकांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अहमदनगरमधून ते निवडून देखील आले. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. निवडणुकांपूर्वी जरी विखे पाटील यांनी काँग्रेससोबतच्या बांधिलकीचा वारंवार पुनरुच्चार केला असला, तरी निवडणुकांनंतर मात्र त्यांनी थेट भाजपचा पुरस्कार करायला सुरुवात केली. अखेर, राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा खऱ्या ठरल्या. आता त्यांनीच संगमनेरमध्ये काँग्रेसचा विषय संपल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच त्यांचा भाजपच्या मंत्रिमंडळात देखील समावेश होणार असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रकाश मेहता आऊट; राधाकृष्ण विखे पाटील इन?

‘निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचाय’

‘माझा भाजप प्रवेश हा काही आता मुद्दा राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा पुरस्कार करून मी आधीच त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केलेली आहे. शिवाय मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा जरी होत असल्या, तरी निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. पण मला जेव्हा केव्हा मुख्यमंत्री सांगतील, तेव्हा मी तयार असेन’, असं विखे पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -