घरमहाराष्ट्रराज्यात पावसाचा कर्फ्यू

राज्यात पावसाचा कर्फ्यू

Subscribe

रविवारी राज्यातील अनेक भागात जोरदार वर्षावृष्टी झाली. कोरोना संसर्गामुळे अगोदर राज्यातील अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे कर्फ्यू अधिकच कडक झालेला दिसून आला.

रविवारी राज्यातील अनेक भागात जोरदार वर्षावृष्टी झाली. कोरोना संसर्गामुळे अगोदर राज्यातील अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे कर्फ्यू अधिकच कडक झालेला दिसून आला. मुंबईसह ठाणे, नाशिक, रत्नागिरी, श्रीवर्धन, उरण, म्हसळा, पनवेल, रायगड, माथेरान, पोलादपूर, भिरा, पेण, वसई, पालघर, भिवंडी, खेड, राजापूर आदी भागातही पावसाने चांगली हजेरी लावली. येत्या २४ तासांमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे आदी भागांसाठी हवामान विभागाने यलो अ‍ॅलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत हॅट्ट्रिक

मुंबई सलग तिसर्‍या दिवशीही पावसाने आपला जोर कायम ठेवत रविवारीही जोरदार हजेरी लावली. परिणामी अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत संचारबंदी असतानाच पावसाने मुंबईकरांच्या अडचणीमध्ये आजही भरच घातली. अनेक भागात अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या गोष्टींची दुकानेही बंद होती. पण दुपारनंतर पावसाचा जोर अनेक भागात कमी झाला. त्यामुळे अनेक भागात साचलेले पाणी कमी होण्यासाठी मदत झाली. मुंबईत सकाळपासूनच सलग सहा तास पावसाचा जोर कायम होता. पण दुपारनंतर पावसाचा जोर मात्र मंदावला. या सुरुवातीच्या सहा तासांमध्ये सरासरी ७० मिमी ते १०० मिमी इतक्या पावसाची नोंद झाल्याचे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने प्रसिद्ध केली.

- Advertisement -

शनिवारपासून पावसाने केलेल्या खोळंब्यामुळे संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक गोष्टींसाठीही लोकांना बाहेर पडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. अनेक भागात पाणी साचल्याने तसेच पावसाचा जोर सकाळपासूनच कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम पहायला मिळाला. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक वळविण्यात आली होती. पण दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने तसेच पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही वाहतूक पूर्वपदावर आली.

येत्या २४ तासांसाठीही मुंबईत काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवार ते रविवारी सकाळपर्यंत एकूण २४ तासांमध्ये कुलाबा येथे १६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सांताक्रुझ येथे १५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पण नवीन आठवड्यात मात्र पावसाचा जोर ओसरेल असा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. येत्या दिवसांमध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

मुंबईत यंदा मान्सूनची हजेरी काही तुरळक ठिकाणचा पाऊस वगळता अतिशय कमी होती. पण गेल्या तीन दिवसांमध्ये मात्र ही कसर मान्सूनने भरून काढली आहे. यंदाच्या मान्सूनच्या कालावधीत १ जूनपासून आतापर्यंत सांताक्रूझ वेधशाळा येथे ७८० मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर कुलाबा वेधशाळा येथे ९१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकमध्ये लावणीला वेग

नाशिक=मुंबईला सलग दोन दिवस पावसाने झोडपल्यानंतर जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाचे आगमन झाले ओहे. यामुळे या आठवड्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये भात लावणीला वेग येऊ शकतो. सायंकाळी सहाच्या दरम्यान नाशिक शहरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गुजरात ते उत्तर केरळपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान पूर्वानुमान विभागाने नऊ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात निसर्ग वादळासोबत आलेल्या पावसामुळे खरीप हंगाम मार्गी लागला असून पश्चिम भागातील भात रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात झाली. हवामान विभागाने हा पाऊस मान्सून असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात कोसळणारा पाऊस हा पूर्वमान्सून स्वरुपाचा होता. त्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात जुलै महिना उजाडला तरी पुरेसा पाऊस झाला नव्हता. या उलट कायम दुष्काळी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत होतेे. भात लावणीसाठी पावसाची प्रतीक्षा असतानाच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होऊन कोकण किनारपट्टी भागात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. तो पाऊस हळू हळू घाटमाध्याकडे सरकला असून रविवारी (दि.५) सकाळपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील इगतपुरी, त्र्यबंकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे या भागात भात लावणीची कामे मार्गी लागणार आहेत. दरम्यान, सकाळपासून ढगाळ हवामान असलेल्या नाशिकमध्येही सायंकाळी जोरदार सरींनी हजेरी लावली. जवळपास अर्धा तास कोसळलेल्या या सरींमुळे नाशिककरांना चिंंब केले. या आठवड्यात दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. हवामान पूर्वानुमान विभागाने पुढील गुरुवार (दि.९) पर्यंत कोकण, गोवा, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

ठाण्याला पावसाने झोडपले

ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरासह ठाणे ग्रामीण भागाला रविवारी जोरदार पावसाने झोडपले. ठाणे शहरातील स्टेशन परिसरात पाणी साचले होते. भिवंडीत कामवारी नदी दुथडी भरून वाहत होती. तर कल्याण उल्हासनगरातील वालधुनी नदीही दुथडी भरल्यानी नदीकाठच्या रहिवाशांनी पावसाची धास्ती घेतली. ठाणे शहरात झाडे कोसळ्याच्या घटना घडल्या, ठाणे शहरात तेली गल्लीत एका इमारतीचा काही भाग कोसळला. मात्र, यात जीवितहानी झाली नाही. चंदनवाडी भागात नाल्यालगतची भिंत कोसळली. तर ठाण्यातील खारटन रोड शीतलामाता मंदिराजवळ रस्ता खचल्याने वाहनचालकांमध्ये भीती पसरली. उल्हासनगरातही ओटी सेक्शन चार भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर पावसामुळे वलगणीचे मासे पकडण्यासाठी नदीकिनारी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला होता. बदलापूरमध्ये सायंकाळी वीज गूल झाली होती. तर चार ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे शहापूर तालुक्यातही झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. मुरबाडममध्येही जोरदार पाऊस झाला. तर वांगणी, शेलू या भागातही जोरदार सरी बरसल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -