घरमहाराष्ट्रराज ठाकरेंचा हिंदुत्वाचा नारा

राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा नारा

Subscribe

शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण आणले ,मी अयोध्येला जाणार ,मशिदीसमोर हनुमान चालिसा करा

महाराष्ट्रात जातीपातीवरून भांडणे, राजकारण सुरू आहेत. आम्ही जातीच्या बाहेर जात नाही. कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत? हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी केला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतिर्थावर घेतलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा सूर आळवून आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही. पण मशिदीवरील भोंगे उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाही तर ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील, त्या मशिदीसमोर स्पीकर लावून हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज यांनी यावेळी दिला. कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा, असेही राज यांनी म्हटले. तर मी लवकरच अयोध्याला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला. मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रातील जनतेचे आहे. मुख्यमंत्रीपदासाठी जे अडीच वर्षांचे राजकारण केले तेच राजकारण समोरची व्यक्तीही आता करत आहे हे लक्षात घ्या. जेव्हा कुटुंबावर गोष्टी येतात तेव्हा आता चिडायची काय गरज आहे? ईडीने मलाही नोटीस पाठवली होती. पण मी गेलोच ना नोटीशीला उत्तर द्यायला. मग यशवंत जाधव यांना चार महिने नोटीस येऊनही ईडी संपत्ती जप्त करते तेव्हा मुख्यमंत्र्यांना इतके चिडायची काय गरज आहे, असाही सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या घरच्यांनी पालिकेत जाऊ नये असाही सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

राज्याचा गृहमंत्री 100 कोटींच्या खंडणी वसुलीच्या आरोपाखाली जेलमध्ये जातो. दाऊदशी संबंध असलेले नवाब मलिक हे जेलमध्ये जातात. अडीच वर्षे जेलमध्ये असलेले छगन भुजबळ हे शिवतिर्थावर मंत्रीपदाची शपथ घेतात. तुमच्या नाकावर टिच्चून सत्ते येऊन या सगळ्या गोष्टी करतात. आपण मात्र लाचारासारखे रांगेत उभे रहायचे. राजकारणी लोक आपल्याला मेंढरासारखे वापरत आहेत. आमच्या हातात राज्य द्या, आम्ही वाटेल ते करू असाच प्रकार सुरू असल्याची टीका राज ठाकरे यांनी सत्ताधार्‍यांवर केली.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीत फूट पाडण्यास सुरुवात
लोक जातीपातीच्या मुद्यावर एकमेकांविरोधात उभे रहावेत ही गोष्ट राष्ट्रवादीला आणि शरद पवार यांना हवी आहे. महाराष्ट्रात १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासूनच जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू झाले, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. जातीच्या निमित्ताने महाराष्ट्रात एकमेकांची भडकवायची कामे सुरू झाली. महाराष्ट्रात एकेकाळी जातीचा अभिमान होता. पण जातीत फूट पाडायची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर झाली. निवडणुकांच्या तोंडावर पैशाचा चारा टाकायचा आणि सत्ता मिळवायची असाच प्रकार सुरू झाला. आम्ही एकमेकांची डोकी फोडायला तयार झालो असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -